• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

अहिल्यानगरचा शौनक माणकेश्‍वर जर्मनीत झळकणार!

ByMirror

Mar 26, 2026
शैक्षणिक, क्रीडा व संशोधन क्षेत्रात दमदार कामगिरी

हॉफ विद्यापीठात ‘मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स’साठी निवड; आंतरराष्ट्रीय स्तरावर नगरचा गौरव


शैक्षणिक, क्रीडा व संशोधन क्षेत्रात दमदार कामगिरी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर येथील चिरंजीव शौनक संतोष माणकेश्‍वर यांची जर्मनीमधील प्रतिष्ठित हॉफ विद्यापीठ येथे उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. ‘मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स’ या विषयात मास्टर्स करण्यासाठी त्यांना ही संधी मिळाली असून, त्यांच्या या यशामुळे अहिल्यानगरच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाचा तुरा रोवला गेला आहे.


शौनक यांनी वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून ‘बॅचलर इन मेकॅनिकल टेक्नॉलॉजी’ हा अभ्यासक्रम उत्कृष्ट गुणांसह पूर्ण केला. त्यांनी तीनही वर्षे ‘फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन’ मिळवत सतत गुणवत्तेत स्थान राखले. नुकत्याच झालेल्या पदवीदान समारंभात त्यांना सन्मानपूर्वक पदवी बहाल करण्यात आली तसेच त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष गौरवही करण्यात आला.


अभ्यासादरम्यान विविध नामांकित कंपन्यांकडून नोकरीच्या संधी मिळूनही शौनक यांनी वेगळा मार्ग निवडत उच्च शिक्षणाचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला वेल्लोर इन्स्टिट्यूटने प्रोत्साहन देत जर्मनीतील विद्यापीठाशी समन्वय साधून त्यांची निवड निश्‍चित केली.


हॉफ विद्यापीठात शिक्षण घेत असताना शौनक आपल्या संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण जर्मनीतील नामांकित औद्योगिक कंपन्यांमध्ये करणार आहेत. यामध्ये नेक्सन्स आणि पॅरागॉन मोवसिस यांचा समावेश आहे. यापूर्वी त्यांनी जर्मनीतील हॅनोव्हर येथे ‘नेक्सन्स’ कंपनीत संशोधन सादर केले असून, तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामाचे विशेष कौतुक केले. हॅनोव्हर हे शहर जागतिक औद्योगिक प्रदर्शनांसाठी प्रसिद्ध असून, तेथे सादरीकरण करत शौनक यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली आहे.


शौनक यांचे शालेय शिक्षण ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल येथे झाले, तर उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी सारडा कॉलेजमध्ये पूर्ण केले. लहानपणापासूनच गुणवत्तेत अव्वल राहणाऱ्या शौनक यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा व कला क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. फुटबॉलमध्ये त्यांनी विशेष प्राविण्य मिळवत डीएसके फुटबॉल क्लबकडून खेळताना यश मिळवले. याच कामगिरीच्या जोरावर त्यांना फुटबॉल क्लब लिव्हरपूल (इंग्लंड) या जागतिक दर्जाच्या क्लबतर्फे स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि त्यांनी विविध पदकेही पटकावली.

त्यांच्या यशामागे कुटुंबीयांचे मोठे योगदान आहे. आजोबा प्रा. शरदराव माणकेश्‍वर व आजी प्रा. शैलजा माणकेश्‍वर यांचे मार्गदर्शन लाभले. आई इंजिनिअर सौ. अर्चना माणकेश्‍वर व वडील श्री. संतोष माणकेश्‍वर (प्रसिद्ध ट्रेनर व व्यवस्थापकीय संचालक) यांनीही सातत्याने प्रेरणा दिली. भगिनी सीए अदिती माणकेश्‍वर यांनी गणित विषयात विशेष मार्गदर्शन केले. शौनक यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल दुर्गा माता समिती, रासने नगर, लायन्स इंटरनॅशनल तसेच विविध सामाजिक संस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अहिल्यानगरचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *