• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

पारगाव मौला जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

ByMirror

Mar 26, 2026
लाल मातीच्या क्रीडांगणाचा लोकार्पण; वृक्षसंवर्धनातून ‘झाडांचा वाढदिवस’ साजरा

लाल मातीच्या क्रीडांगणाचा लोकार्पण; वृक्षसंवर्धनातून ‘झाडांचा वाढदिवस’ साजरा


माझी शाळा, माझा अभिमान बाळगून बाबासाहेब बोडखे यांचे कार्य प्रेरणादायी -शिक्षणाधिकारी संध्याताई गायकवाड

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी नगर तालुक्यातील पारगाव मौला येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगसह शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. तर माजी आमदार स्व. अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मागील वर्षी लावण्यात आलेल्या झाडांचे संवर्धन करुन यंदा त्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच मुलांसाठी तयार केलेल्या लाल मातीच्या क्रीडांगणाचे लोकार्पण गुणे आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाचे अध्यक्ष सचिन जगताप यांच्या हस्ते झाले.
प्रारंभी झाडांचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्याताई गायकवाड, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील, बाबासाहेब बोडखे, शहर बँकेचे व्हाईस चेअरमन प्रा. माणिक विधाते, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक सुरज घाटविसावे, प्राचार्य मारुती लांडगे, बाळासाहेब बोडखे, शरद दळवी, बबन शिंदे, बाजार समितीचे माजी उपसभापती संतोष म्हस्के, धनगरवाडीचे माजी सरपंच वीरकर आण्णा, पारगावचे सरपंच वैभव बोठे, गट शिक्षणाधिकारी तृप्ती कोलते, अमोल बोडखे, शांतीनाथ खेडकर, राजू बोडखे, पै. विराज बोडखे, बबन शिंदे, अमोल क्षीरसागर, देसाई सर, देवीदास गीते, संजय शिरसाठ, किरण डहाणे, उमेश भोईटे, शिंदे सर आदींसह शालेय शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रास्ताविकात बाबासाहेब बोडखे म्हणाले की, मागील वर्षी स्व. अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत लावलेली झाडे बहरली आहे. दरवर्षी काकांच्या स्मरणार्थ गावात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला जाणार आहे. ज्या शाळेत माझे प्राथमिक शिक्षण झाले, त्या शाळेप्रती जाणीव ठेऊन हा उपक्रम राबविण्यात आला आहे. स्व. अरुणकाकांनी अनेकांचे संसार उभे केले, कार्यकर्त्यांना उभे राहण्याची प्रेरणा व बळ दिले. तसेच आरोग्य जपण्याचा देखील त्यांचा संदेश होता, त्यांच्या विचाराने शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि खेळासाठी मैदान सज्ज करुन देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.


शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील म्हणाले की, दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचण सोडविण्यासाठी सायकलसह विविध साहित्य वाटपाचे उपक्रम बोडखे यांनी राबविले आहेत. शाळा हरित करण्यासह बालकांच्या क्रीडा विकासासाठी त्यांनी उभे केलेले मैदानाचे कार्य प्रेरणादायी आहे. जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता वाढत असताना, जिल्हा परिषद शाळांकडे नागरिकांचा कल वाढला आहे. अनेक अधिकारी जिल्हा परिषद शाळेतून घडले असून, जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांवर विश्‍वास ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले. तसेच चौथीला सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेला सामोरे जावे लागणार असल्याची माहिती दिली.
शिक्षणाधिकारी संध्याताई गायकवाड म्हणाल्या की, माझी शाळा, माझा अभिमान बाळगून माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी योगदान देण्याची गरज आहे. बाबासाहेब बोडखे यांची आपल्या शाळेप्रती असलेली आस्था व तळमळ पाहून शाळेचा विकास होत आहे. या कार्यात शिक्षण विभाग देखील योगदान देत आहे. गणित, लेखन व वाचन ही संकल्पना पूर्ण करुन विद्यार्थी पुढे जावे हा उद्देश ठेऊन कार्य सुरु आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास हेच नवीन शैक्षणिक धोरणात अभिप्रेत असून, त्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


संतोष म्हस्के म्हणाले की, आपल्या नेत्याबद्दल निष्ठा कशी असावी? याचे मुर्तीमंत उदाहरण बाबासाहेब बोडखे आहे. काकांच्या प्रेरणेने ते देखील अनेकांना समाजात शिक्षणाने उभे करण्याचे काम करत आहे. सामाजिक जीवनात त्यांची नेहमीच उणीव भासत असते. वर्तमान काळातील कामाची नोंद भविष्यात होत असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रा. माणिक विधाते म्हणाले की, वर्तमान काळात चांगले कार्य करुन सामाजिक योगदान द्या. उद्याचे कोणी सांगू शकत नाही. काकांनी सर्वांवर प्रेम करुन त्यांना आधार दिले. ही झाडे त्यांच्या रुपाने जीवंत राहणार असून, सर्वांना प्रेमाची सावली देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


धनगरवाडीचे माजी सरपंच वीरकर आण्णा म्हणाले की, बाबासाहेब बोडखे अनेक गरजूं घटकातील मुलांना शिक्षणासाठी आधार देण्याचे काम करत आहे. अनेक शाळांमध्ये तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना सातत्याने ते मदत करत असतात. लक्ष्मीच्या मंदिराची गोष्ट सांगून त्यांनी शिक्षणातून परिस्थिती बदलण्याचा संदेश दिला.


पारगाव सरपंच वैभव बोठे म्हणाले की, समाजात अनेक श्रीमंत व्यक्ती आहे, मात्र योग्य ठिकाणी खर्च करण्याची दानत लागते. स्वखर्चाने गरजू घटकातील मुलांना ते शिक्षणासाठी मदत करत आहे. हे कार्य तळमळीने सुरु असून, या शाळेत मैदान बनविताना स्वत: श्रमदान केले. काकांच्या प्रेरणेने त्यांची सामाजिक वाटचाल सुरु असून, गावातील अनेकांचे शैक्षणिक अडचणी सोडविण्याचे काम ते करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *