भिंगारच्या भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये योगभवनाचे लोकार्पण
उद्यानात ओपन जिम व स्वच्छतागृहासाठी निधी देण्याची घोषणा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजातील नागरिकांना एकत्र आणून सामाजिक, पर्यावरणीय आणि निरोगी जीवनशैलीची चळवळ उभारणारे हरदिन मॉर्निंग ग्रुपचे कार्य प्रेरणादायी आहे. भिंगार शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असून कचरा मुक्तीसाठी प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे अत्यंत गरजेचे आहे. सार्वजनिक स्वच्छता हीच आरोग्याची पहिली पायरी असून याबाबत समाजात जागरूकता निर्माण झाली पाहिजे. उद्याच्या सक्षम पिढीसाठी आजपासूनच स्वतःवर निर्बंध आणत स्वच्छतेला प्राधान्य देण्याची मानसिकता तयार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
भिंगार छावणी परिषदेच्या भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये योग व प्राणायामासाठी उभारण्यात आलेल्या योगभवनाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी उद्यानात ओपन जिम तसेच स्वच्छतागृह उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा त्यांनी केली. या कार्यक्रमाला भिंगार छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड, हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, माजी उपाध्यक्ष संभाजी भिंगारदिवे, माजी नगरसेवक ज्ञानदेव पांडुळे यांच्यासह ग्रुपचे सदस्य व उद्यानात येणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार जगताप पुढे म्हणाले की, नव्याने उभारलेल्या योगभवनामुळे पावसाळा व उन्हाळ्यातही नागरिकांना व्यायाम, योग व प्राणायामाचा लाभ अखंडपणे घेता येणार आहे. सुदृढ आणि सक्षम पिढी घडविण्यासाठी आजपासूनच योग्य पावले उचलणे आवश्यक आहे. भिंगारमध्ये विकासकामांना गती देत परिसराचा कायापालट करण्याचे काम सुरू आहे. भिंगारचा महापालिकेत समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र संरक्षण विभागाच्या अखत्यारीतील जागा व शहराशी असलेले भौगोलिक अंतर यामुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे भविष्यात भिंगारमध्ये स्वतंत्र नगरपंचायत स्थापन करून विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अतिक्रमणाच्या मुद्द्यावरही त्यांनी ठाम भूमिका मांडली. शासनाच्या जमिनीवर होणाऱ्या अतिक्रमणासाठी संबंधित अधिकारी जबाबदार असल्याचे सांगत त्यांनी म्हटले की, योग्य वेळी कारवाई केली तर अतिक्रमण होण्याची शक्यता कमी होते. विभागांनी तक्रारीची वाट न पाहता स्वतःहून पुढाकार घेऊन कारवाई करावी. पुढील दहा ते पंधरा वर्षांचे नियोजन करून विकासकामे सुरू आहेत आणि प्रशासनाने ठाम भूमिका घेऊन काम केल्यास भिंगार शहर कचरा मुक्त व अतिक्रमणमुक्त करण्याचा संकल्प पूर्ण होईल.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जॉगिंग पार्कमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते योगभवनाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. प्रास्ताविकात हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांनी सांगितले की, ग्रुपच्या रौप्य महोत्सवी वर्षात योगभवनाचे स्वप्न साकार होत असल्याचा विशेष आनंद आहे. योग आणि प्राणायामासाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध झाल्याने आरोग्याची चळवळ अधिक जोमाने पुढे जाईल. ग्रुपच्या माध्यमातून लोकसहभागातून उद्यानातील झाडांसाठी पाण्याचे टँकर उपलब्ध करून देणे, कोरोना काळात रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिरे, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, वृक्षारोपण व संवर्धन तसेच निरोगी जीवनासाठी योग-व्यायामाचा प्रसार अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्वच्छता अभियानातही ग्रुप सक्रियपणे सहभागी होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सचिन चोपडा यांनी सांगितले की, योगासाठी उभारलेली ही वास्तू केवळ हॉल नसून आरोग्याचे केंद्र ठरणार आहे. सकाळच्या योग-प्राणायामामुळे मानसिक समाधान मिळते आणि आरोग्यदायी जीवनशैलीची जाणीव निर्माण होते. या ठिकाणातून आरोग्यविषयक चळवळीला नवे बळ मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भिंगार छावणी परिषदेचे उपाध्यक्ष वसंत राठोड यांनी सांगितले की, भिंगार छावणीसाठी यापूर्वी इतका मोठा निधी कधीच मिळाला नव्हता. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नांमुळे मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाल्याने विकासकामांना गती मिळाली असून जनसामान्यांच्या समस्या मार्गी लागत आहेत. त्यांच्या विकासकामांमुळे भिंगारची प्रतिमा बदलत आहे. लवकरच भिंगार अतिक्रमणमुक्त करण्यासाठीही पुढाकार घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच शुक्रवार बाजार परिसरातील पाण्याच्या टाकीला गळती लागल्याचा प्रश्न मांडत त्यांनी सांगितले की, दुरुस्ती करण्यापेक्षा नवीन पाण्याची टाकी उभारल्यास भविष्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो. यासाठी आमदार संग्राम जगताप यांचे सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश पसपुल यांनी केले, तर आभार सर्वेश सपकाळ यांनी मानले.
