• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

अहिल्यानगरात १९ मार्चला “ग्लोबल ब्रेन ड्रेन” आंदोलन

ByMirror

Mar 16, 2026
मध्यपूर्वेतील युद्धाविरोधात जागतिक शांततेचा संदेश दिला जाणार

मध्यपूर्वेतील युद्धाविरोधात जागतिक शांततेचा संदेश दिला जाणार


युद्ध थांबवण्यासाठी जागतिक रीकॉन्शिओ गव्हर्नन्सची मागणी; दिल्ली गेटसमोर आंदोलन

अहिल्यानगर (प्रतिनिधी) – जगभर वाढत चाललेल्या युद्ध आणि संघर्षांच्या पार्श्वभूमीवर मानवतेच्या रक्षणासाठी आणि मध्यपूर्वेतील युद्ध तातडीने थांबवण्याच्या मागणीसाठी अहिल्यानगर शहरात “ग्लोबल ब्रेन ड्रेन” आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १९ मार्च रोजी दिल्ली गेट परिसरात हे आंदोलन होणार असल्याची माहिती पीपल्स हेल्पलाईनचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.

ॲड. गवळी यांनी सांगितले की, सध्या मध्यपूर्व आणि आखाती प्रदेशात सुरू असलेल्या संघर्षामुळे जगभर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या युद्धामुळे मोठ्या प्रमाणावर निरपराध नागरिकांचा बळी जात असून लाखो लोकांना विस्थापित व्हावे लागत आहे. याशिवाय नैसर्गिक संपत्ती, पर्यावरण, पायाभूत सुविधा आणि मानवी विकासावरही गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.


युद्धामुळे मानवी प्रगतीला मोठा धक्का बसत असून विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून निर्माण झालेली मानवी क्षमता विनाशाच्या दिशेने वळत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर जागतिक शांततेचा संदेश देण्यासाठी आणि युद्धविरोधी भूमिका ठामपणे मांडण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.


यावेळी ॲड. गवळी म्हणाले की, युद्ध आणि संघर्षांमुळे केवळ मानवी जीवितहानीच होत नाही, तर मानवी बुद्धिमत्ता, संशोधनशक्ती आणि ज्ञानसंपत्तीचाही मोठ्या प्रमाणावर नाश होतो. जगातील वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि बुद्धिजीवी वर्गाने निर्माण केलेली प्रचंड क्षमता युद्धासाठी वापरली जात असल्यामुळे मानवजातीच्या विकासाला मोठा अडथळा निर्माण होतो. “मानवी बुद्धिमत्ता आणि विज्ञान हे विनाशासाठी नव्हे, तर मानवकल्याणासाठी वापरले गेले पाहिजे. युद्धामुळे होणारा ज्ञानसंपत्तीचा नाश म्हणजेच ‘ग्लोबल ब्रेन ड्रेन’ होय,” असे त्यांनी स्पष्ट केले.


मानवजातीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी संपूर्ण जगाने विवेकाधारित आणि जबाबदार जागतिक शासनव्यवस्था स्वीकारणे आवश्यक असल्याचे ॲड. गवळी यांनी सांगितले. त्यांच्या मते, आजच्या काळात केवळ आर्थिक किंवा तांत्रिक प्रगती पुरेशी नाही. मानवतावादी मूल्ये, ज्ञान, विवेक आणि जबाबदार निर्णयप्रक्रिया यांवर आधारित ग्लोबल रीकॉन्शिओ गव्हर्नन्स निर्माण झाल्यासच युद्ध आणि संघर्षांवर दीर्घकालीन नियंत्रण मिळवता येईल.

या आंदोलनात अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे, वीरबहादूर प्रजापती, अशोक भोसले, रईस शेख, विठ्ठल सुरम आदी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहितीही ॲड. गवळी यांनी दिली. शहरातील नागरिकांनी या आंदोलनात सहभागी होऊन जागतिक शांततेच्या संदेशाला बळ द्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *