महिला दिनानिमित्त विद्यार्थिनी व शिक्षिकांचा गौरव
हिंद सेवा मंडळाच्या भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये सन्मान सोहळा उत्साहात
मासूम संस्थेकडून रात्रशाळेतील महिला व युवतींसाठी तब्बल 8 लाखांची शिष्यवृत्ती
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रात्रशाळेत प्रवेश घेऊन जीवनातील अनेक अडचणींवर मात करत शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या महिला व युवतींसह त्यांना शिक्षण देणाऱ्या महिला शिक्षिकांचा आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गौरव करण्यात आला. शहरातील हिंद सेवा मंडळाच्या भाई सथ्था नाईट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मासूम संस्थेच्या वतीने रात्रशाळेतील महिला व युवतींना शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षणासाठी तब्बल 8 लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. ही शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या महिला व युवतींचा देखील यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
पेमराज सारडा ज्युनिअर कॉलेजचे चेअरमन डॉ. पारस कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला हिंदुस्तान पेट्रोलियम गॅस वितरक अनुराधा देशमुख, आडसुळ इंजिनिअरींग कॉलेज डेप्युटी ऑफिस सुप्रिटेंडंट सौ. शकुंतला पाटील, ॲड. शुभांगी रोहोकले, नाईट हायस्कूल चेअरमन प्रा. ज्योतीताई कुलकर्णी, प्राचार्य सुनिल सुसरे, शालेय समिती सदस्य विलास बडवे, शिक्षक प्रतिनिधी मंगेश भुते, शिक्षकेतर प्रतिनिधी कैलास बालटे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात ज्योतीताई कुलकर्णी म्हणाल्या की, रात्रशाळेत महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून महिला व युवती कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत शिक्षण घेत आहेत. या रात्रशाळेतील विद्यार्थिनींनी राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवून अभिमानास्पद कामगिरी केली आहे. मुलगी लग्नापूर्वी आणि लग्नानंतर दोन्ही कुटुंब उजळून टाकते. जीवनात आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी नियमित व्यायाम व चांगला आहार महत्त्वाचा आहे. महिलांचे आरोग्य चांगले असल्यास त्या संपूर्ण कुटुंबाची काळजी घेऊ शकतात. ज्या घरात महिलांचा मान-सन्मान राखला जातो, तेथे लक्ष्मी प्रसन्न राहते, असे त्या म्हणाल्या. पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य सुनील सुसरे यांनी केले.
अनुराधा देशमुख म्हणाल्या की, महिलांनी त्यागाची भूमिका सोडून प्रगती साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वतःवर प्रेम करावे आणि शिक्षण, आरोग्य व व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिल्यास यश मिळते. शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थिनींनी या संधीचे सोने करून स्वतःमधील क्षमता ओळखावी, असे त्यांनी आवाहन केले.
शकुंतला पाटील म्हणाल्या की, प्रत्येक दिवशी महिलांचा सन्मान झाला पाहिजे. संसाराची जबाबदारी सांभाळून रात्रशाळेत शिक्षण घेणाऱ्या महिलांचे कार्य कौतुकास्पद आहे. जीवनात विपरीत परिस्थिती आल्यास न डगमगता परिस्थितीचा धैर्याने सामना करा आणि गुरुजनांचा आदर राखा. आयुष्यात अनेक परीक्षा येतात, त्यांना आत्मविश्वासाने सामोरे जाणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
ॲड. शुभांगी रोहोकले म्हणाल्या की, लग्नानंतर महिलांनी आपले करिअर थांबवू नये. शिक्षणामुळे आत्मनिर्भरता मिळते. सासर कसे असेल याची शाश्वती नसल्याने शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहणे आवश्यक आहे. शेवटपर्यंत शिक्षणच आपल्याला तारणार आहे. केवळ डिग्रीसाठी नव्हे तर ज्ञानासाठी शिक्षण घ्या आणि जीवनात यशाकडे झेप घ्या, असा संदेश त्यांनी दिला. तसेच त्यांनी वन स्टॉप सेंटरची माहिती देऊन कौटुंबिक हिंसाचाराविरोधात महिलांच्या हक्कांची जाणीव करून दिली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. पारस कोठारी म्हणाले की, प्रत्येकाच्या यशस्वी जीवनामागे एक स्त्री असते. स्त्री ही समाजात विविध भूमिका निभावत पुरुषाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. त्यामुळे स्त्रीचा सन्मान करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. तसेच रात्रशाळेतील विद्यार्थ्यांसाठी मासूम संस्थेच्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली.
यावेळी मासूम संस्थेच्या चेअरमन निकिता केतकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन जीवनात उंच भरारी घेण्याचे आवाहन केले. विलास बडवे यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात अनुराधा देशमुख व शकुंतला पाटील यांनी रात्रशाळेसाठी आर्थिक मदत दिली. विद्यार्थिनी संध्या डोईफोडे, स्वाती दुनगु, शीला सुंबे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी समाजातील बालविवाहमुक्त व बालकामगारमुक्त समाज घडविण्यासाठी उपस्थितांनी शपथ घेतली. तसेच शालेय समिती सदस्य विलास बडवे यांची हिंद सेवा मंडळ संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद पवार यांनी केले, तर मासूम संस्थेचे पदाधिकारी व उपस्थितांचे आभार स्वाती होले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
–
मासूम संस्थेकडून रात्रशाळेतील महिलांना 8 लाख रुपयांची शिष्यवृत्ती
रात्रशाळेतील महिला व युवतींना विविध व्यावसायिक प्रशिक्षणासाठी मासूम संस्थेच्या वतीने एकूण 8 लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली.
ॲडव्हान्स फॅशन डिझाईनिंग (प्रत्येकी 49 हजार) रामेश्वरी जाधव, अश्विनी अंबे, दिव्या बोगा, पूजा शेळके, खुशी पाटील, ममता लक्षेटी, वैशाली साठे.
आरी वर्क कोर्स (प्रत्येकी 20 हजार) बबीता साळवे, गीता गोहेर, तृप्ती जगताप, वैशाली शेलार, संध्या खोमणे, स्वाती दुनगु, स्नेहल गीते.
संगणक कोर्स (प्रत्येकी 23 हजार) भाग्यश्री चरकु, संध्या डोईफोडे, मंगला रांधवन, मंदा भोराडे, सुनिता लकशेट्टी, ओम काळे, अनिरुद्ध कुलकर्णी, अनिरुद्ध देशमुख, आकाश गायकवाड, मीनल डोळस, काजल चांदेकर.
डीएमएलटी (प्रत्येकी 64 हजार) माई फाजगे.
