स्वर्गीय अरुणकाका जगताप यांच्या सानिध्यात घडलेले बोडखे हे समाजकारणी शिक्षक -आ.संग्राम जगताप
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब बोडखे यांची नियुक्ती झाल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी शहर सहकारी बँकेचे व्हाइस चेअरमन प्रा. माणिक विधाते, नगरसेवक विकी जगताप, विशाल नाकाडे, आंधळे, प्रा. रावसाहेब चौधरी, महेश दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की, बाबासाहेब बोडखे हे माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक असून संघटनात्मक कार्यात त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला आहे. शिक्षकांच्या वेतन, सेवा अटी, बदली, निवृत्तीवेतन आदी विविध प्रश्नांवर त्यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. स्वर्गीय अरुणकाका जगताप यांच्या सानिध्यात घडलेले ते समाजकारणी शिक्षक आहेत. गोरगरीब व दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ते सातत्याने मदत करत असून, अनेक वंचित घटकांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व त्यांनी स्वीकारले आहे. शिक्षण क्षेत्रात सामाजिक वसा जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते करत असल्याचे सांगून आमदार जगताप यांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, बाबासाहेब बोडखे यांनी शिक्षकांच्या प्रश्नांवर सातत्याने ठाम भूमिका मांडत संघटनात्मक ताकद वाढवली आहे. ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी झालेली त्यांची नियुक्ती ही त्यांच्या कार्याची पावती आहे. “बोडखे यांनी केवळ पदासाठी नव्हे, तर शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रशासनाशी प्रभावी संवाद साधला. संघर्षशील व अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.”
बाबासाहेब बोडखे यांच्या नियुक्तीमुळे ग्रामीण भागातील शिक्षकांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे न्याय मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. सत्कार सोहळ्यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
