• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त मरणोत्तर देहदानाचा संकल्प

ByMirror

Feb 25, 2026
जिल्हा रुग्णालयात कुटुंबीयांसह भरुन दिला संकल्प अर्ज

जिल्हा रुग्णालयात कुटुंबीयांसह भरुन दिला संकल्प अर्ज


जीवन संपले तरी शरीराने इतरांना उपयोगी पडावे -अशोक शिंदे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक शिंदे यांनी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त मरणोत्तर देहदानाचा संकल्प करून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला. आपल्या कुटुंबीयांसह जिल्हा रुग्णालयात उपस्थित राहून त्यांनी देहदानाचा संकल्प अर्ज अधिकृतरित्या भरून दिला.


हा उपक्रम जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली, नेत्र विभागाचे समुपदेशक सतीश आहिरे यांच्या पुढाकाराने तसेच महाराष्ट्र शासन पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते सुनील सकट यांच्या माध्यमातून राबविण्यात आला. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी प्रविण बोठे यांच्या हस्ते शिंदे यांना देहदान संकल्प प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास कर्मचारी व्यवस्थापक प्रमोद बोराटे, उषा शिंदे, वैष्णवी शिंदे, विक्रम वैरागर, आराध्या वैरागर, सार्थक शिंदे यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी व शिंदे कुटुंबीय उपस्थित होते.


अशोक शिंदे म्हणाले की, धर्मातील रूढी-परंपरांना फाटा देत त्यांनी देहदानाचा निर्णय घेतला आहे. “मृत्यूनंतर देह जळतो किंवा पुरला जातो; परंतु त्याच देहातून एखाद्याला नवी दृष्टी, नवा श्‍वास आणि नवजीवन मिळत असेल, तर त्याहून मोठी समाजसेवा कोणती?” असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.


अवयवदान व देहदानामुळे मनुष्य मृत्यूनंतरही जिवंत राहतो, असे सांगत त्यांनी मृत्यूनंतर कोणतेही धार्मिक विधी न करता पत्नीनेही विधवांच्या परंपरेत न अडकता सुवासिनीसारखे आयुष्य जगावे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
सुनील सकट म्हणाले की, अशोक शिंदे यांचा हा निर्णय केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. देहदान, नेत्रदान व अवयवदान याविषयी समाजात अजूनही मर्यादित प्रमाणात चर्चा होते. अशा कृतींमुळे लोकांचा दृष्टीकोन सकारात्मक बदलतो. शासनाच्या विविध मोहिमा यशस्वी होण्यासाठी समाजातील जागरूक नागरिकांचा सहभाग आवश्‍यक असल्याचे त्यांनी नमूद केले.


नेत्र विभागाचे समुपदेशक सतीश आहिरे यांनी सांगितले की, देहदान आणि अवयवदान ही वैद्यकीय शिक्षण व उपचार प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. समाजात याबाबत जागरूकता वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या समाजप्रबोधनाच्या विचारांना अनुसरून अशोक शिंदे यांनी घेतलेला देहदानाचा संकल्प हा खऱ्या अर्थाने मानवतेचा संदेश देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *