• Sat. Feb 21st, 2026

शालार्थमधील बीडीएस प्रणाली तात्काळ सुरू करा -बाबासाहेब बोडखे

ByMirror

Feb 21, 2026

शिक्षक, शिक्षकेतरांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम अडकली


शिक्षक परिषदेची शिक्षण आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शालार्थ वेतन प्रणालीतील बीडीएस (बिल डिस्बर्समेंट सिस्टीम) व्यवस्था तात्काळ सुरू करून भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खात्यावरील अंतिम परतावा तसेच अग्रिम रक्कम संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांना त्वरीत वितरित करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष तथा माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शिक्षण आयुक्तांना दिले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली.


शालार्थ वेतन प्रणालीतील बीडीएस व्यवस्था बंद असल्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी खात्यावरील अंतिम परतावा रक्कम गेल्या चार महिन्यांपासून मिळालेली नाही. परिणामी, निवृत्तीनंतरच्या विविध गरजांसाठी या रकमेवर अवलंबून असलेल्या अनेक शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.


याचबरोबर कार्यरत शिक्षक व कर्मचाऱ्यांनाही भविष्य निर्वाह निधी खात्यातील परतावा अथवा ना-परतावा अग्रिम रक्कम मिळवणे दुरापास्त झाले आहे. वैद्यकीय उपचार, मुलांचे शिक्षण, घरबांधणी किंवा इतर अत्यावश्‍यक कारणांसाठी आवश्‍यक असलेली ही रक्कम वेळेत न मिळाल्याने शिक्षक वर्गात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.


भविष्य निर्वाह निधी ही शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठीची सुरक्षित तरतूद मानली जाते. आपल्या सेवाकाळात काटकसरीने साठवलेली ही रक्कम वेळेवर न मिळाल्यामुळे संबंधितांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर बीडीएस प्रणाली तातडीने सुरू करणे अत्यावश्‍यक व निकडीचे असल्याचे शिक्षक परिषदेने स्पष्ट केले आहे.


“शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा”
सेवानिवृत्तीनंतर विविध कारणांसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक गरज भासते. भविष्यातील नियोजन लक्षात घेऊन ते भविष्य निर्वाह निधीच्या रकमेवर अवलंबून असतात. मात्र सध्या शालार्थमधील बीडीएस प्रणाली बंद असल्याने अनेकांना गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासनाने तात्काळ बीडीएस प्रणाली सुरू करून भविष्य निर्वाह निधी खात्यावरील रक्कम संबंधितांना वितरित करावी. -बाबासाहेब बोडखे (जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *