• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

केडगाव येथील स्वस्त धान्य दुकान प्रकरण तापले

ByMirror

Feb 18, 2026
केडगाव येथील स्वस्त धान्य दुकान प्रकरण तापले

अवसायनात असलेल्या संस्थेच्या चेअरमनने अपील करून दुकान मिळविल्याचा आरोप


राष्ट्रवादी काँग्रेसकडून कारवाईची मागणी; पत्रकार परिषदेत पुरावे सादर

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- खोटी माहिती सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करत केडगाव येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 72 चालविणाऱ्या लक्ष्मी औद्योगिक संस्थाच्या चेअरमनवर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर संघटक राजेश भालेराव व शहर उपाध्यक्ष राम धोत्रे यांनी केली आहे. सोमवारी (दि. 17 फेब्रुवारी) आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संबंधित प्रकरणाची सविस्तर माहिती देत पुरावेही सादर केले.


2018 मध्ये दुकान निलंबित
केडगाव येथे लक्ष्मी औद्योगिक संस्थाच्या नावाने स्वस्त धान्य दुकान कार्यरत होते. सप्टेंबर 2018 मध्ये अन्नधान्य वितरणाबाबत तपासणी करण्यात आली असता दुकानात गंभीर त्रुटी आढळून आल्या. त्यानंतर मा. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दि. 16 ऑक्टोबर 2018 रोजी सदर दुकान निलंबित केले होते.
या निर्णयाविरुद्ध संबंधित संस्थेच्या चेअरमनने मा. उपायुक्त (पुरवठा), नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले होते. मात्र दि. 6 फेब्रुवारी 2025 रोजी उपायुक्त (पुरवठा), नाशिक यांनी ते अपील फेटाळले.
अवसायनात असताना अपील कसे?


उपायुक्तांनी अपील फेटाळल्यानंतर संबंधित व्यक्तीने अप्पर सचिव, पुरवठा विभाग, मंत्रालय, मुंबई येथे लक्ष्मी औद्योगिक संस्थाच्या चेअरमन या नात्याने पुन्हा अपील दाखल केले. हे अपील मंजूर झाल्याने स्वस्त धान्य दुकान पुन्हा पूर्ववत मिळाल्याचे भालेराव व धोत्रे यांनी सांगितले.
मात्र, उपनिबंधक सहकारी संस्था, अहिल्यानगर यांनी दि. 28 मार्च 2025 रोजी लक्ष्मी औद्योगिक संस्था अवसायनात काढलेली असल्याचे पत्र जारी केले आहे. म्हणजेच संबंधित संस्था अधिकृतपणे अस्तित्वात नसताना त्या व्यक्तीने चेअरमन म्हणून अपील कसे दाखल केले? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.


संस्था अवसायनात असताना त्या व्यक्तीस चेअरमन या नात्याने कोणताही कायदेशीर अधिकार नसताना सुनावणीस उपस्थित राहून शासनाची दिशाभूल करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला.
उद्योग नोंदणीही नसल्याचा दावा
पत्रकार परिषदेत नगर तालुका उपनिबंधकांचे संस्थेच्या अवसायनाबाबतचे पत्र तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग आधार व उद्यम नोंदणी नसल्याचे पत्र सादर करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण प्रकरणात शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या सर्व बाबींची सखोल चौकशी करून संबंधित चेअरमनवर फौजदारी कारवाई करावी, तसेच शासनाची दिशाभूल करणाऱ्यांवर कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी राजेश भालेराव व राम धोत्रे यांनी केली आहे.


भिंगार येथील एका व्यक्तीला सहा ते सात रेशन दुकानाचा परवाना देण्यात आला आहे. याबाबत देखील पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. असे अनेक गंभीर प्रकार पुरवठा विभागात आढळत असून, याची चौकशी केल्यास या मागील सूत्रधार शोधता येणार आहे. यासंदर्भात कारवार्इ न झाल्यास आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन केले जाणार. -राजेश भालेराव (शहर संघटक, राष्ट्रवादी काँग्रेस)

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *