• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

नगर तालुक्यातील 31 शाळांना प्रोजेक्टर भेट

ByMirror

Feb 16, 2026
नगर तालुक्यातील 31 शाळांना प्रोजेक्टर भेट

शिक्षक आमदार किशोर दराडे यांचा डिजिटल शिक्षणाला हातभार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शालेय विद्यार्थ्यांना अद्यावत व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या उद्देशाने शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी नगर तालुक्यातील 31 माध्यमिक शाळांना प्रोजेक्टरची भेट दिली आहे. डिजिटल वर्गांची उभारणी करून विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक धोरणानुसार आधुनिक शिक्षण देण्याचा त्यांचा मानस आहे.


यापूर्वीही आमदार दराडे यांनी जिल्ह्यातील विविध शाळांना भेटी देत प्रोजेक्टरचे वाटप केले होते. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात आणखी सुमारे 350 प्रोजेक्टरचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे ग्रामीण व भागातील शाळांमध्ये डिजिटल साधनसामग्रीची उपलब्धता वाढणार आहे.


सद्यस्थितीत शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढले आहे. डिजिटल माध्यमातून शिकविल्यास विद्यार्थ्यांची आकलनशक्ती वाढते, अभ्यास अधिक रंजक बनतो आणि विषयांची समज अधिक प्रभावीपणे होते. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयार करताना अशा आधुनिक साधनांची गरज भासते.


या पार्श्‍वभूमीवर प्रत्येक शाळेत डिजिटल वर्ग निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रोजेक्टर वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना काळानुरूप सक्षम करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याची भावना आमदार दराडे यांनी व्यक्त केली आहे.


प्रोजेक्टर वाटप कार्यक्रमावेळी नगर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संभाजी पवार, आमदार दराडे यांचे स्वीय सहाय्यक हरीश मुंडे, शिक्षक नेते वैभव सांगळे, विकास शिंदे आदींसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे नगर तालुक्यातील शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाला चालना मिळणार असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही पायरी निश्‍चितच उपयुक्त ठरणार असल्याची भावना शिक्षक वर्गाने व्यक्त केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *