• Fri. Feb 13th, 2026

निमगाव वाघा येथील ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात होणार विविध क्षेत्रातील प्रज्ञावंतांचा गौरव

ByMirror

Feb 12, 2026

ॲड. भूषण बऱ्हाटे यांची प्रज्ञावंतांच्या गौरव सोहळ्याच्या अध्यक्षपदी निवड

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे पाचव्या राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रज्ञावंतांचा राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव करण्यात येणार आहे. या प्रज्ञावंतांच्या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. भूषण बऱ्हाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


हे संमेलन गुरुवार दि. 19 फेब्रुवारी रोजी गावातील परिवार मंगल कार्यालयात उत्साहात पार पडणार आहे. ग्रामीण भागातील साहित्य, संस्कृती, सामाजिक जाणिवा व नव्या विचारांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रज्ञावंतांचा राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव करण्यात येणार असल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी दिली.
ॲड. भूषण बऱ्हाटे नोटरी पब्लिक (भारत सरकार) असून, ते अहिल्यानगर बार असोसिएशन व लॉयर्स को-ॲाप. सोसायटीचे माजी चेअरमन आहेत. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे ते सदस्य असून, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाचे समन्वयक म्हणून देखील काम पाहत आहेत.


आंतरराष्ट्रीय वकील परिषद (नवी दिल्ली) व राज्यस्तरीय वकील परिषद (छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे) इतर कायदेविषयक जनजागृती अभियान व शिबीर सहभाग घेऊन त्यांनी व्याख्याने देखील दिली आहेत. ॲड. बऱ्हाटे यांचे सामाजिक, संस्कृतीक, धार्मिक व शैक्षणिक कार्यात देखील सातत्याने कार्य सुरु असून, या विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांची प्रज्ञावंतांच्या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नियुक्ती करण्यात आली आहे.


या साहित्य संमेलनाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ॲड. भूषण बऱ्हाटे यांच्या हस्ते सामाजिक, साहित्य, आरोग्य, शैक्षणिक, कला, क्रीडा, उद्योग व पर्यावरण अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *