• Tue. Jun 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी कौशल्य आत्मसात करा -ॲड. सुरेश लगडचांदा शाळेत विद्यार्थी, शिक्षक पालकांना मार्गदर्शन

ByMirror

Feb 10, 2026
सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी कौशल्य आत्मसात करा -ॲड. सुरेश लगड चांदा शाळेत विद्यार्थी, शिक्षक पालकांना मार्गदर्शन

अहिल्यानगर: येणाऱ्या काळात सायबर गुन्हेगारांपासून स्वत:ला सुरक्षित कसे ठेवायचे, हे कौशल्य प्रत्येकाल शिकून घ्यावे लागणार आहे. आज प्रत्येकाच्या घरात स्मार्ट फोन आहेत. या माध्यमातून हे गुन्हेगार सहज ऑनलाईन फसवणूक करतात. यासाठी पालकांनी मुलांचे हातात फोन देऊ नये, तसेच विद्यार्थ्यांनीही केवळ अभ्यासाकडेच लक्ष केंद्रीत करून कुठल्याही डिजिटल गॅझेटपासून दूर रहावे, असे आवाहन ज्येष्ठ विधितज्ज्ञ तथा विशेष सरकारी वकिल ॲड. सुरेश लगड यांनी केले.


नेवासा तालुक्यातील चांदा येथील जिल्हा परिषद प्रथमिक केंद्र शाळेत सोमवारी सायबर गुन्हेगारी आणि सुरक्षितता या विषयावर लगड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक व पालकांना त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. कांचन दहातोंड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. ॲड. लगड म्हणाले. विद्यार्थीदशेतील कार्यकाल खूप संवेदनशील असतो. या काळात विद्यार्थ्यावर चांगले संस्कार घडणे गरजेचे आहे. तसेच समाजात कसे वावरायचे याचेही धडे विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे. शाळेबाहेर, गावात किंवा अन्य ठिकाणी कुणी अनोळखी व्यक्तींनी आपल्याला चॉकलेट अथवा खाऊ दिला तर तो घेऊ नये, अनोळखी व्यक्तीसाेबत कुठे जाऊ नये. या संदर्भात शिक्षक किंवा आई-वडिलांना तत्काळ माहिती द्यावी.  कायदेशीरदृष्ट्या आपल्याला पूर्णत: संरक्षण आहे. असे याप्रसंगी ॲड. लगड विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले. डॉ. दहातोंडे म्हणाले कुणी त्रास देत असेल तर ते सहन न करता याबाबत विद्यार्थ्यांनी तत्काळ पालक अथवा शिक्षकांना माहिती द्यावी. आजचे बालक हे उद्याचे भविष्य आहेत. म्हणून त्यांना घडविणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. प्रास्ताविक मुख्यध्यापिका एम.एम. गर्जे यांनी केले. सूत्रसंचलन शांता मरकड यांनी तर आभार व्ही.व्ही. बनकर यांनी मानले. याप्रसंगी डॉ. सुधाकर निकाळजे, शामराव पवार, सुभाष शेंडे, शाळेचे शिक्षक एस.के. जाधव, एस.बी. गोसावी, एस.डी. पुरी, एस.बी. दुसुंग आदी उपस्थित होते.

चांदा येथील जिल्हा परिषद प्रथमिक केंद्र शाळेत सायबर गुन्हेगारी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विशेष सरकारी वकिल ॲड. सुरेश लगड.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *