• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप

ByMirror

Feb 5, 2026
पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप

एमआयडीसीत वृक्षांची कत्तल

झाडांच्या केवळ फांद्या न कापता थेट खोडापर्यंत झाडे तोडण्यात आल्याचा आरोप

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील एमआयडीसी परिसरात पर्यावरणावर घाला घालणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एल ॲण्ड टी कंपनीच्या गेट क्रमांक 3 समोर मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल करण्यात आल्याचे उघडकीस आले असून, यामुळे पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे ही झाडतोड पावसाळा नसताना करण्यात आली आहे. नियमानुसार झाडांची छाटणी किंवा कत्तल करण्यासाठी संबंधित विभागाची परवानगी आवश्‍यक असते. मात्र येथे झाडांच्या केवळ फांद्या न कापता थेट खोडापर्यंत झाडे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे ही कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
एल ॲण्ड टी कंपनीच्या गेट क्रमांक 3 समोरील रस्ता हा एमआयडीसी कार्यालयाकडे जाणारा प्रमुख मार्ग आहे. या रस्त्यावरून रोज एमआयडीसीचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी ये-जा करतात. अशा महत्त्वाच्या रस्त्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल होऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष कसे झाले, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
ही झाडतोड अनधिकृत ट्रान्सपोर्ट पार्किंगसाठी करण्यात आली की कोणाच्या खासगी फायद्यासाठी, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. एमआयडीसी कार्यालयाच्या अगदी जवळ ही घटना घडूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे संबंधित विभागांची भूमिका संशयास्पद ठरत असल्याचा आरोप होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *