• Thu. Feb 5th, 2026

जीएसटी अधिकारी असलेल्या घोडके कुटुंबीयांवर खोटे गुन्हे दाखल झाल्याचा आरोप

ByMirror

Feb 5, 2026

गुन्ह्यांची सखोल चौकशी करून न्याय देण्याची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी


जातीय द्वेषातून खोटे गुन्हे दाखल; पुरावे असूनही पोलिसांकडून कारवाई कशी? रिपाईचा प्रश्‍न

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विवेक प्रभाकर घोडके (क्लास-1 अधिकारी, GST अन्वेषण विभाग, मुंबई), सोनिया विवेक घोडके व ग्रीष्मा विवेक घोडके या उच्चशिक्षित मागासवर्गीय समाजातील व्यक्तींवर जातीय सूडभावनेतून खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई)च्या वतीने करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांची सखोल व निष्पक्ष चौकशी करून घोडके कुटुंबाला न्याय द्यावा, अशी मागणी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, विवेक घोडके हे कादंबरी नगरी-3, इस्कॉन मंदिराजवळ, गावडे मळा, पाईपलाईन रोड येथे वास्तव्यास असून ते GST अन्वेषण विभाग, मुंबई येथे उच्च पदावर कार्यरत आहेत. मात्र, फिर्यादींनी जातीय द्वेषातून व सूडबुद्धीने घोडके कुटुंबावर सातत्याने खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.


दि. 9 ऑक्टोबर 2024 रोजी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात फिर्यादी यांनी गुन्हा यशोदा नगर मैदान येथे घडल्याचे सांगितले आहे. मात्र, त्या ठिकाणी कोणतेही CCTV कॅमेरे नसून कोणताही ठोस साक्षीदार नसताना गुन्हा कसा दाखल होतो, असा प्रश्‍न रिपाईने उपस्थित केला आहे. यानंतर दि. 12 ऑगस्ट 2025 रोजीही विवेक घोडके यांच्यावर पुन्हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रत्यक्षात त्या दिवशी विवेक घोडके हे GST भवन, मुंबई येथे ‘ऑन ड्युटी’वर होते. त्याबाबतचे सर्व अधिकृत पुरावे उपलब्ध असूनही गुन्हा नोंदवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.


तसेच दि. 31 डिसेंबर 2025 रोजी घोडके कुटुंबावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये कलम 109 अंतर्गत ‘हाफ मर्डर’सारखा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, या कथित घटनेत फिर्यादीला कोणतीही गंभीर इजा, जखम किंवा रक्तस्राव झालेला नसून सिव्हिल हॉस्पिटलचे कोणतेही ‘ग्रेव्हियस सर्टिफिकेट’ अथवा ठोस वैद्यकीय पुरावे उपलब्ध नाहीत. तरीसुद्धा इतका गंभीर गुन्हा कसा दाखल होतो, असा प्रश्‍न रिपाईने उपस्थित केला आहे.
याशिवाय, गुन्हा घडल्याच्या वेळेस विवेक घोडके हे पुण्यातील वाकड येथील हॉटेल मराठवाडा येथे उपस्थित असल्याचे CCTV फुटेज उपलब्ध असून, त्या आधारे न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. असे असताना कोणतीही प्राथमिक चौकशी न करता वारंवार गुन्हे दाखल होणे हे संशयास्पद असल्याचे रिपाईचे म्हणणे आहे.


फिर्यादी कुटुंब सतत घोडके कुटुंबाशी वाद घालत असून जातीवाचक शिवीगाळ, अपमान व धमकावणी करत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. घोडके हे महार समाजातील व उच्च पदावर कार्यरत असल्यामुळेच त्यांच्याविरोधात द्वेषातून कारवाया केल्या जात असल्याचे रिपाईचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल, निष्पक्ष व स्वतंत्र चौकशी करून खोटे गुन्हे नेमके कसे दाखल झाले, याची सत्यता समोर आणावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई)च्या वतीने करण्यात आली आहे. तसेच, पुढील काळात कोणतीही शहानिशा न करता घोडके कुटुंबावर खोटा गुन्हा दाखल झाल्यास, रिपाईच्या वतीने संबंधित पोलीस कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *