पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
लैंगिक छळ, जीवे मारण्याची धमकी व कौटुंबिक हिंसाचाराचे गंभीर आरोप
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हुंड्याच्या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक, मानसिक व लैंगिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहानंतर अवघ्या काही दिवसांतच छळाला सुरुवात झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
फिर्यादी महिलेचा विवाह दि. 28 एप्रिल 2025 रोजी प्रतिक हेमंत बेंद्रे (रा. देशमुख वस्ती, आंबळे, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्याशी अहिल्यानगर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्टर पद्धतीने झाला होता. त्यानंतर हॉटेल रेडियन्स येथे मोठ्या थाटामाटात विवाह समारंभ पार पडला होता. विवाहात फिर्यादीच्या वडिलांनी संसारोपयोगी साहित्य, दागिने, मंगळसूत्र, कर्णफुले, पैजन तसेच पतीस रोख एक लाख रुपये व सोन्याची अंगठी दिली होती. विवाहासाठी सुमारे 15 ते 20 लाख रुपयांचा खर्च केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
विवाहानंतर सुरुवातीचे चार-पाच दिवस सासरी नीट वागणूक देण्यात आली. मात्र त्यानंतर सासू अनुपमा बेंद्रे व नणंद सुप्रिया चौधरी यांनी माहेरकडून कमी सोने दिल्याचे टोमणे मारण्यास सुरुवात केली. “मोठ्या सुनेने घरातील सर्व फर्निचर व सामान आणले आहे, तुझ्या वडिलांनी काहीच दिले नाही,” असे म्हणून वारंवार 15 तोळे सोने आणण्याची मागणी करण्यात येत होती. तसेच जाव प्रियंका बेंद्रे हिने घरातील सर्व जड व हलकी कामे जबरदस्तीने करून घेत शेतातील कामासाठीही पाठवले. काम न केल्यास उपाशी ठेवणे, आजारी असतानाही उपचार न करणे, असा अमानुष छळ केल्याचा आरोप आहे.
तक्रारीत मानलेले मामे सासरे प्रशांत घोरपडे यांच्याकडून लैंगिक छळ झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अंघोळीच्या वेळी जबरदस्तीने जवळ बोलावणे, शरीराला स्पर्श करणे, हात पकडणे, अश्लील वर्तन करणे, अशा घटना वारंवार घडल्याचे फिर्यादीने सांगितले. याबाबत पतीकडे तक्रार केल्यानंतरही त्याने संरक्षण देण्याऐवजी छळात साथ दिल्याचे नमूद आहे.
भाऊ पवन बेंद्रे यानेही अश्लील नजर टाकणे, अंगावर हात फिरवणे, विरोध केल्यास मारहाण करणे, असा प्रकार केल्याचा आरोप आहे. पती प्रतिक बेंद्रे याने “घरातील सर्व निर्णय माझ्याच माणसांचे चालतात,” असे म्हणत फिर्यादीला धमकावले व माहेरहून पैसे आणण्याचा दबाव टाकला.
दि. 5 ऑगस्ट 2025 रोजी तब्येत बरी नसतानाही फिर्यादीला शेतातील विहिरीजवळ नेऊन “15 तोळे सोने व 10 लाख रुपये आणले नाहीत तर विहिरीत ढकलून आत्महत्येचा बनाव करू,” अशी जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. घाबरून फिर्यादी व तिच्या वडिलांनी पोलीस हेल्पलाईन 112 वर संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फिर्यादीला सुरक्षितपणे बाहेर काढले.
या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पती प्रतिक बेंद्रे, सासू अनुपमा बेंद्रे, भाऊ पवन बेंद्रे, जाव प्रियंका बेंद्रे, नणंद सुप्रिया चौधरी, मानलेले मामे सासरे प्रशांत घोरपडे व अरविंद घोरपडे यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी प्रतिबंधक कायदा, शारीरिक व मानसिक छळ तसेच लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत.
