भिंगारमध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम; नागरिकांसह युवकांमध्ये पर्यावरण संवर्धन व स्वच्छतेची जाणीव
राजमाता जिजाऊ यांनी संस्कारांची शिदोरी, तर स्वामी विवेकानंदांनी युवा शक्तीला दिशा दिली -सीए रवींद्र कटारिया
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून थोर राष्ट्रमाता व युगपुरुषांना अभिवादन करत पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सीए रवींद्र कटारिया, भारतीताई कटारिया व मुन्ना वाघस्कर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या वेळी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सचिन चोपडा, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे, रमेश वराडे, डॉ. दमन काशीद, जहीर सय्यद, ताराचंद ठोकळ, सर्वेश सपकाळ, दिलीपराव ठोकळ, दीपक मेहतानी, अभिजीत सपकाळ, सुधीर कपाळे, अविनाश जाधव, अशोकराव पराते, अनिल हळगावकर, रतन मेहेत्रे, दीपक घोडके, संदीप पाटील, अविनाश पोतदार, राजू शेख, डॉ. अतुल मडावी, बाबासाहेब नागपुरे, सुंदरराव पाटील, योगेश हळगावकर, देविदास गंडाळ, निजाम पठाण, दीपक लिपाने, दीपक अमृत, विशाल भामरे, तुषार घाडगे गुरुजी, सखाराम अळकुटे, दशरथ मुंडे, रवींद्र ताठे, विनोद रवोत आदींसह ग्रुपचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क परिसरात सर्व उपस्थितांनी प्रत्यक्ष श्रमदान करत स्वच्छता केली. परिसरातील नागरिकांनाही स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत “स्वच्छ परिसर निरोगी जीवन” हा संदेश देण्यात आला. या उपक्रमातून युवक व नागरिकांमध्ये वृक्षप्रेम, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव करुन देण्यात आली. यावेळी उपस्थितांनी आपल्या परिसराची स्वच्छता राखण्याचा व वृक्ष लागवड करुन त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प केला.
सीए रवींद्र कटारिया म्हणाले की, राजमाता जिजाऊ यांनी संस्कारांची शिदोरी दिली, तर स्वामी विवेकानंदांनी युवा शक्तीला दिशा दिली. आज पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. केवळ भाषण न करता प्रत्यक्ष कृतीतून वृक्षारोपण व स्वच्छता केल्यास त्यांचा आदर्श आपण जपू शकतो. प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ म्हणाले की, समाज घडविताना पर्यावरण आणि स्वच्छतेला केंद्रस्थानी ठेवणे आवश्यक आहे. जिजाऊ व विवेकानंद यांचे विचार आत्मसात करत सामाजिक उपक्रम राबविणे हेच खरे अभिवादन आहे. युवकांनी अशा उपक्रमात पुढाकार घेतला तर स्वच्छ, सुंदर आणि हरित नगर निर्माण होऊ शकणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
सचिन चोपडा म्हणाले की, स्वच्छता आणि वृक्षारोपण ही केवळ एक दिवसाची मोहीम न राहता ती आपली दैनंदिन सवय झाली पाहिजे. आजच्या पिढीला पर्यावरणाचे महत्त्व समजले तरच उद्याचा भारत सुरक्षित राहील. अशा उपक्रमातून समाजात सकारात्मक बदल घडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे यांनी निसर्गाची सेवा म्हणजे ईश्वराची सेवा आहे. झाडे लावणे, परिसर स्वच्छ ठेवणे हीच खरी भक्ती आहे. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांनी समाजहितासाठी आपले जीवन अर्पण केले. त्यांच्या विचारांप्रमाणे चालत पर्यावरण रक्षणाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारण्याचे त्यांनी आवाहन केले.
