सांस्कृतिक कार्यक्रमातून सामाजिक प्रश्नाने लक्ष वेधून घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन
विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये पालक व शिक्षकांची भूमिका महत्त्वाची – पद्मश्री पोपटराव पवार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ओॲसिस इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर नाटिका सादर केली. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या दारिद्रया पासून त्याचे मुलांचे हाल, कर्जबाजारीपणा यामध्ये दाखवण्यात आलेली आत्महत्या पाहून पालकांचे डोळे पाणवले. या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृती व परंपरेचे दर्शन घडविण्यात आले. विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन पद्मश्री पोपटराव पवार व भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे, ज्येष्ठ संचालक रघुनाथ लोंढे, सचिव सचिन कोतकर, वैशालीताई कोतकर, ज्ञानदेव बेरड,जयसिंग दरेकर, साहेबराव कारले, बन्सी नरवडे, प्राचार्य सौ. कल्पना दरकुंडे, स्कूलचे सर्व शिक्षक, कर्मचारी, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की, केडगाव मधील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना इंग्लिश माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्याचे काम ही संस्था करत आहे. यामागे भानुदास कोतकर यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी कोणताही एक खेळ किंवा कला जोपासावी त्यामुळे जीवन आनंदी व निरोगी बनते. खेळातून व्यक्तीमत्व विकास होतो. सकारात्मक ऊर्जा मिळते. कोणतीही परीक्षा न देता, खेळातून क्लास वन अधिकारी होता येते. करिअरचा एक चांगला पर्याय म्हणून आपल्या आवडत्या खेळाकडे पाहिले पाहिजे, असा सल्ला त्यांनी विद्यार्थी व पालकांना दिला.
शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे म्हणाले की, प्रत्येक मूल हे हुशार असते, त्यांना घडविण्याचे काम शिक्षक व पालकांचे असते. मुलांचा कल पाहून त्या दिशेने त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मुलांचा मानसिक व शारीरिक विकास होण्याकडे देखील विशेष लक्ष देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये पालक व शिक्षकांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
कार्यक्रमचे प्रास्ताविकात वैशाली कोतकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. या प्रसंगी विविध कला, क्रीडा व शैक्षणिक परीक्षांमध्ये व स्पर्धापरीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी हिंदी व मराठी गीतांवरील नृत्यप्रकार, देशभक्तीपर गीत, पारंपरिक लोकनृत्याचे सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थित पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
