देशभक्ती, भक्ती व कलेचा सुरेल संगम; विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला पालक व नागरिकांची दाद
रयत शिक्षण संस्था ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून समाज घडवणारी चळवळ -पोपट पवार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव देवी येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री अंबिका प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालय यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला ‘स्नेहतरंग’ हा दोन दिवसीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांचे प्रभावी दर्शन घडवत भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा सादर केला.
या सांस्कृतिक सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपट पवार हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य राजेंद्र मोरे, संस्थेचे माजी सचिव शिवाजीराव भोर, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेवराव पांडुळे, सहाय्यक विभागीय अधिकारी बाबासाहेब नाईकवाडी, रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग कार्यालयीन प्रमुख राजनारायण पांडुळे, रावसाहेब सातपुते, प्रशांत कोतकर, महेश गुंड, कृष्णाजी थोरात, पोपटशेठ शिंगवी, किसन सातपुते, अमृत महाराज शिंदे, पंडितराव झावरे, नवनाथ बांडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य तथा विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांनी केले. त्यांनी विद्यालयात राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक, सांस्कृतिक व व्यक्तिमत्त्व विकासाच्या उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
पोपट पवार म्हणाले की, “आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही, तर विद्यार्थ्यांच्या कलात्मक, सांस्कृतिक व नैतिक विकासालाही तितकेच महत्त्व आहे. श्री अंबिका विद्यालयाने ‘स्नेहतरंग’सारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आपले गुण सादर करण्याची संधी दिली, ही अत्यंत अभिनंदनीय बाब आहे. रयत शिक्षण संस्था ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून समाज घडवणारी चळवळ आहे. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून भारतीय संस्कृती, देशभक्ती, परंपरा आणि सामाजिक मूल्यांचे सुंदर दर्शन घडले. शिक्षकांनी घेतलेली मेहनत आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास यामुळे हा कार्यक्रम अत्यंत दर्जेदार झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भक्तिगीते, भावगीते, महाराष्ट्राची पारंपरिक लावणी, एकांकिका व नाटिका यांचे अत्यंत प्रभावी सादरीकरण केले. बालकलाकारांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या या कलाविष्काराला उपस्थित पालक, नागरिक व मान्यवरांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून दाद दिली.
विद्यालयातील सर्व वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांची स्वतः मेहनत घेऊन तयारी करून घेतली. चालू शैक्षणिक वर्षात विद्यालय नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, स्नेहतरंग कार्यक्रमाचे औचित्य साधत स्थानिक स्कूल कमिटी, सल्लागार समिती सदस्य व सर्व सेवकांनी विद्यार्थी व पालकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख जयश्री भोस व प्रियंका सातपुते यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपमुख्याध्यापक सुखदेव मुरूमकर, पर्यवेक्षक अभयकुमार चव्हाण, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पुजा गोरे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री भोस, प्रियंका सातपुते, पुजा गोरे, स्वाती औटी व कांचन ससे यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
