रात्रीच्या शिक्षणातून उमलले कलागुण; विद्यार्थ्यांनी रंगवले स्नेहसंमेलन
शिस्त, जिद्द व त्यागातून यशाचा मंत्र -डॉ. रेणुका पाठक
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील नवविद्या प्रसारक मंडळाच्या सरस्वती मंदिर नाईट स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडले. विविध कारणांमुळे शिक्षण अर्धवट सोडल्यानंतर पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आलेल्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून आपले कलागुण सादर करत कार्यक्रमात चैतन्य निर्माण केले. हिंदी-मराठी गाण्यांवर सादर झालेली नृत्ये, कोळी नृत्य व रिमिक्सवर विविध संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली.

स्नेहसंमेलनाचे उद्घाटन डॉ. रेणुका पाठक यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी भगवान साळवे, शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग गवळी, यांच्यासह विविध रात्र शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी व सदस्य तसेच नाईट स्कूलचे आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक पांडुरंग गवळी यांनी दिवसभर कष्ट करून रात्री शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. मंगल कनगरे या विद्यार्थिनीने सुमधुर स्वागतगीत सादर केले. पाहुण्यांचा परिचय सुषमा धारूरकर यांनी करून दिला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
मार्गदर्शनपर भाषणात डॉ. रेणुका पाठक यांनी जीवनात यश मिळविण्यासाठी शिस्त, जिद्द व त्याग यांचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षणामुळे आत्मसन्मान वाढतो, निर्णयक्षमता विकसित होते आणि व्यक्तिमत्त्व समृद्ध होते, असे त्यांनी नमूद केले. तसेच योग्य आहार, नियमित व्यायाम व वेळेचे नियोजन याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भगवान साळवे यांनी “कष्टाला पर्याय नाही; कष्टापुढे नशीबही झुकते,” असा प्रेरणादायी संदेश देत जीवनात खचून न जाता सातत्याने पुढे जाण्याचा कानमंत्र दिला.
सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी लावणी, हिंदी-मराठी गीतांवरील नृत्य, कोळी नृत्य तसेच रिमिक्सवर सादरीकरण करत रंगत वाढवली. अनेक विद्यार्थी आपल्या कुटुंबियांसह कार्यक्रमात सहभागी झाले होते. ‘आता थांबायचं नाही’ या नाटिकेद्वारे विद्यार्थिनींनी नाईट स्कूलमधील शिक्षणप्रक्रिया, येणाऱ्या अडचणी, गमती-जमती आणि शिक्षणाचे जीवनातील महत्त्व प्रभावीपणे मांडले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणांना टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद मिळाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीणा कुऱ्हाडे व विलास शिंदे यांनी केले, तर आभार देवका लबडे यांनी मानले. सागर मुर्तडकर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर, मानद सचिव निलेश वैकर, मानद सहसचिव चंद्रशेखर धर्माधिकारी, शाळा समिती अध्यक्ष अनिरुद्ध गीते, खजिनदार मंगेश धर्माधिकारी, सदस्य विजय देवचके निलेश वैकर व विजय देवचके यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास शिंदे, राजू भुजबळ तसेच मासूम संस्थेचे स्कूल प्रतिनिधी महेंद्र म्हसे यांनी विशेष परिश्रम घेतले.
