शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, नैतिक मूल्ये व सामाजिक जबाबदारी विकसीत होणे आवश्यक -आशाताई फिरोदिया
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आशा एज्युकेशन फाउंडेशन संचालित जय बजरंग प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला. या स्नेहसंमेलनातून भारतीय संस्कृती, परंपरा तसेच या मातीतील थोर शूरवीरांचा गौरवशाली इतिहास प्रभावीपणे सादर करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या बहुरंगी कलागुणांनी उपस्थित पालक, नागरिक आणि मान्यवरांना मंत्रमुग्ध केले.

स्नेहसंमेलनाचे उद्घाटन आशाताई फिरोदिया यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी आशा एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, उपाध्यक्षा राखीताई फिरोदिया, रेखाताई सारडा, सहसचिव उमेश गांधी, व्यवस्थापकीय संचालक अमित बुरा, व्यवस्थापक आशुतोष घाणेकर, विद्यालयाच्या प्राचार्या संगीता पाठक, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अमोल क्षीरसागर, जय बजरंग तपोवन माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वर्षाताई कुसकर यांच्यासह पालक, शिक्षकवृंद, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आशाताई फिरोदिया म्हणाल्या की, “आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे भवितव्य आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिस्त, प्रामाणिकपणा व चिकाटीच्या बळावर शिक्षणात प्रगती करावी.” शिक्षणाबरोबरच संस्कार, नैतिक मूल्ये व सामाजिक जबाबदारी यांची जोपासना होणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांनी अपयशाची भीती न बाळगता सातत्याने प्रयत्न करत राहावे, असे आवाहन करत त्यांनी डॉक्टर, अभियंता, शिक्षक, प्रशासक, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत विद्यार्थी उज्ज्वल भवितव्य घडवू शकतात, असा विश्वास व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी अशा स्नेहसंमेलनांसारख्या उपक्रमांची नितांत गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी विविध कला, क्रीडा व शैक्षणिक परीक्षांमध्ये व स्पर्धापरीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी हिंदी व मराठी गीतांवरील नृत्यप्रकार, देशभक्तीपर गीत, पारंपरिक लोकनृत्य तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या नाटिका व गीतनाट्यांचे सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थित पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
