• Tue. Dec 30th, 2025

सावेडीत पहिल्या श्री समर्थ कथेचे आयोजन

ByMirror

Dec 27, 2025

2 ते 4 जानेवारी दरम्यान रंगणाऱ्या भक्तीमय सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन


श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ व रिलायबल इन्वेस्टमेंटस्‌ यांचा संयुक्त उपक्रम

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- श्री मनाचे श्‍लोक व अध्यात्मिक-धार्मिक ग्रंथसंपदेतून भारतीय समाजमन घडवणारे राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनचरित्रावर आधारित “एक तरी कथा अनुभवावी” या पहिल्या श्री समर्थ कथेचे आयोजन श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ व रिलायबल इन्व्हेस्टमेंटस्‌ यांच्या वतीने 2 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये करण्यात आले आहे. नवीन वर्षातील या पहिल्या धार्मिक कथामालेचा समर्थ भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री समर्थ कथा सोहळा समितीप्रमुख संजय कुलकर्णी यांनी केले आहे.


सावेडीच्या श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेच्या प्रांगणामध्ये 2 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता, 3 व 4 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता संपन्न होणाऱ्या या कथामालेमध्ये भारतासह परदेशात अध्यात्म विचार रुजविणारे कथाकार अजेयबुवा रामदासी महाराज यांचे सुश्राव्य प्रवचन व रसाळ वाणीच्या माध्यमातून साधकांना समर्थ विचारांची आगळीवेगळी पर्वणी मिळणार आहे. याचबरोबर श्री समर्थांची ग्रंथसंपदा तसेच राष्ट्र निर्माण कार्याची प्रस्तुती दाखवणाऱ्या “श्री समर्थ दर्शन”या माहितीपर प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे.


केमिकल इंजिनिअर म्हणून भारतासह परदेशात काम केल्यानंतर कथाकार श्री अजेय बुवा रामदासी यांनी श्री समर्थ सेवा मंडळ, श्रीक्षेत्र सज्जनगड, श्रीक्षेत्र शिवथरघळ, श्रीधर स्वामी मठ आदींपासून अध्यात्म कार्य सुरू करून श्रीराम कथा, श्री हनुमान कथा, श्री सुंदर कांड, श्रीकृष्ण कथा, महाभारत कथा, व्यंकटेश कथा, श्री समर्थ रामदास स्वामी चरित्र, विविध धार्मिक ग्रंथ इत्यादींचे मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत या भाषांमध्ये अध्यात्म जागरणाचे काम समस्त देशभर ते अविरत करीत आहेत.


दासनवमी उत्सव, विश्‍वविक्रमी सूर्यनमस्कार सोहळा यासह विविधांगी उपक्रम राबवणाऱ्या व गेल्या 55 वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून सुमारे 4 शाळांच्या माध्यमातून विद्यादानाचा यशस्वी सुवर्णमहोत्सव साजरा करणाऱ्या श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ व आर्थिक साक्षरता तसेच आर्थिक नियोजन या क्षेत्रात गेल्या दोन दशकांपासून काम करणाऱ्या रिलायबल इन्व्हेस्टमेंटस्‌ च्या माध्यमातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


“बदलत्या आधुनिक जीवनशैलीमध्ये तंत्रज्ञान जरी महत्त्वाचे असले तरी मनाच्या जडणघडणीसाठी अध्यात्म विचार अत्यंत आवश्‍यक आहेत. आपल्या संततीला घडवण्यासाठी आई-वडिलांकडे श्री समर्थ विचार पोहोचले तर ते अधिक उत्तम पिढी घडवू शकतील. या समर्थ कथेच्या माध्यमातून पायाभूत संस्कार पुन:श्‍च रुजवण्याचे आमचे प्रयत्न आहेत. आई, वडील, पालक यांच्यासह ज्येष्ठांनी या श्री समर्थ कथेचा लाभ घ्यावा.”असे प्रतिपादन मंडळाचे कार्यकारीणी सदस्य तथा समर्थरत्न माजी विद्यार्थी संघाचे प्रमुख संजय कुलकर्णी यांनी केले आहे.


या श्री समर्थ कथेसाठी जास्तीत जास्त समर्थभक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र जोशी, उपाध्यक्ष दीपक ओहोळ, चेअरमन विकास सोनटक्के, व्हा.चेअरमन श्रीपाद कुलकर्णी, सचिव प्रभाकर ओहोळ, सचिव सुरेश क्षीरसागर, कार्यकारिणी सदस्य ॲड.किशोर देशपांडे, स्वप्निल कुलकर्णी, संध्या कुलकर्णी, ॲड. वेद देशपांडे, सुनील जोशी, सचिन क्षीरसागर व निमंत्रित सदस्य स्वप्निल सोनटक्के, प्राचार्या वसुधा जोशी, मुख्याध्यापिका धनश्री गुंफेकर, मुख्याध्यापक सुनील कानडे, मुख्याध्यापक अजय महाजन यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच मंडळाच्या चारही शाळांचे पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विविध समित्यांच्या माध्यमातून परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *