• Tue. Dec 30th, 2025

केडगाव येथील सेंट थॉमस चर्चमध्ये नाताळ उत्साहात

ByMirror

Dec 25, 2025

‘अंधारापासून प्रकाशाकडे’ संदेश देणारा भव्य देखावा ठरला आकर्षण


प्रभू येशूंच्या जन्मोत्सवाचा भक्तिमय सोहळा रंगला; सुख, शांती व प्रेमाचा संदेश देत नाताळ साजरा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नाताळ (ख्रिसमस) निमित्त केडगाव येथील व्हिनशेसन मिशन सर्व्हिस सोसायटी संचलित सेंट थॉमस चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून बुधवारी (दि. 24 डिसेंबर) रात्री व गुरुवारी भक्तिभावाने विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. ख्रिस्तजन्माच्या आनंदात संपूर्ण चर्च परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.


गोठ्यात जन्म घेतलेल्या प्रभू येशू ख्रिस्तांनी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी दिलेल्या संदेशावर आधारित ‘अंधारापासून प्रकाशाकडे प्रवास’ या संकल्पनेवर चर्च परिसरात भव्य व अर्थपूर्ण देखावा साकारण्यात आला होता. चर्चचे फादर जीमील एम.जे. यांच्या मार्गदर्शनाखाली या देखाव्यासह मिस्सा, प्रार्थना व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


बुधवारी रात्री चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्मानिमित्त विशेष मिस्सा (प्रार्थना) मल्याळम भाषेत पार पडली. यावेळी सांताक्लॉजच्या वेशभूषेत ब्रदर्स उपस्थित राहून लहानग्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. गुरुवारी नाताळ सणाच्या दिवशी डिव्हाईन आश्रमात मराठी भाषेत प्रार्थना घेण्यात आली. प्रभू येशूंच्या जन्माचे जल्लोषात स्वागत करत आनंद व्यक्त करण्यात आला.


या सोहळ्यासाठी फादर थॉमस, फादर सज्जोई, फादर जॉसेफ, फादर लिबीन, फादर ड्युबन यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमास ॲड. निर्मला चौधरी, ॲड. एस. व्ही. चौधरी, ॲड. सुमेध चौधरी, कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलच्या प्राचार्या दिव्या सिस्टर, व्यवस्थापिका अंतरेस सिस्टर यांच्यासह सिस्टर, ब्रदर, मल्याळम ख्रिश्‍चन समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


यावेळी फादर जीमील एम.जे. यांनी आपल्या संदेशात सांगितले की, ख्रिस्तजन्मोत्सव ही संपूर्ण जगासाठी सुवार्ता आहे. प्रभू येशू सुख, शांती, प्रेम व समृद्धी घेऊन जगात अवतरले. मानवाच्या कल्याणासाठी त्यांचा जन्म व त्यांची शिकवण आजही मार्गदर्शक ठरते. हाच संदेश चर्चमध्ये उभारलेल्या देखाव्यातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.


‘अंधारापासून प्रकाशाकडे प्रवास’ या संकल्पनेवर आधारित पाळणाघरामध्ये शाही राजवाडा, रक्ताचा सांठा, कमकुवत घरे, वाळवंट, उपासनेचे ठिकाण (सिनेगॉग), बार, प्रतिबिंबाचे ठिकाण व स्मशानभूमी अशी विविध प्रतीके साकारण्यात आली आहेत. या प्रतीकांमधून आजच्या समाजातील लोभ, पाप, नैतिक अधःपतन, संघर्ष, आत्मपरीक्षण व अंतिम सत्य अधोरेखित करण्यात आले आहे. येशू ख्रिस्तच ‘जगाचा प्रकाश’ असून तेच ‘मार्ग, सत्य आणि जीवन’ असल्याचा संदेश देत प्रकाशाच्या मार्गाने चालण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


या उपक्रमाच्या माध्यमातून नाताळाच्या पवित्र काळात प्रभू येशू प्रत्येकाच्या हृदयात जन्म घेऊन अंधार दूर करावा, सत्य, नीतिमूल्ये व आध्यात्मिक जीवनाकडे सर्वांना मार्गदर्शन लाभावे, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्माचा देखावा आकर्षक गव्हाणीमध्ये साकारण्यात आला असून, संपूर्ण चर्च परिसर विद्युत रोषणाईने सजविण्यात आला आहे. या भव्य सजावटीमुळे भाविक व नागरिकांचे लक्ष वेधले गेले असून नाताळ सणाचा उत्साह परिसरात दिसून आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *