• Wed. Dec 31st, 2025

ईपीएस-95 व उच्च पेन्शनसाठी अहिल्यानगरमध्ये सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांची बैठक

ByMirror

Dec 20, 2025

जिल्हा बँक प्रशासन आणि राष्ट्रीय संघर्ष समितीच्या समन्वयातून होणार प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा


जॉइंट ऑप्शन दिलेले सर्व पात्र; साताऱ्याच्या धर्तीवर अहिल्यानगरमध्ये उच्च पेन्शनचा लाभ मिळण्यासाठी संघटना प्रयत्नशील

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील जिल्हा सहकारी बँकेच्या पद्मश्री विखे पाटील सभागृहात बँकेच्या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी उच्च पेन्शन (ईपीएस-95) संदर्भात सविस्तर मार्गदर्शनपर सभा उत्साहात पार पडली. राष्ट्रीय संघर्ष समिती ईपीएस-95 यांच्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्ह्यातील तसेच परिसरातील मोठ्या संख्येने सेवानिवृत्त बँक कर्मचारी व पेन्शनधारक उपस्थित होते.


या मार्गदर्शन सभेला राष्ट्रीय संघर्ष समितीचे पश्‍चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर, महाराष्ट्र प्रमुख अजित घाडगे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख देवीसिंग जाधव (अण्णा), पश्‍चिम महाराष्ट्र प्रमुख इंदरसिंग जाधव, महिला आघाडीच्या उपाध्यक्ष आशाताई शिंदे, जिल्हा बँकेचे जनरल मॅनेजर जयंत देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष टी.एस. उर्फ बाळासाहेब देशमुख, जिल्हाध्यक्ष संपत समिंदर, दहिफळे, बाबुराव दळवी, प्रकाश गायके आदी मान्यवर उपस्थित होते.


सभेत 1 सप्टेंबर 2014 नंतर सेवानिवृत्त झालेल्या र्इपीएस-95 पेन्शनधारकांच्या विविध प्रश्‍नांवर सखोल चर्चा झाली. उपस्थित सेवानिवृत्तांनी उच्च पेन्शन संदर्भातील अडचणी, ईपीएफओकडे दिलेल्या जॉइंट ऑप्शन फॉर्म्सची स्थिती, नाकारलेले अर्ज तसेच कोणतीही माहिती न मिळालेल्या प्रकरणांबाबत प्रश्‍न उपस्थित केले. यावेळी सुभाषराव पोखरकर, अजित घाडगे, देवीसिंग जाधव (अण्णा) आणि दहिफळे यांनी कायदेशीर तरतुदी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा आधार, तसेच ईपीएस-95 अंतर्गत उच्च पेन्शन मिळविण्याची प्रक्रिया सविस्तरपणे स्पष्ट केली.


यावेळी मार्गदर्शन करताना सुभाषराव पोखरकर यांनी सांगितले की, ज्यांनी जॉइंट ऑप्शन फॉर्म्स ईपीएफओकडे सादर केले आहेत, ज्यांना ते नाकारल्याचे कळविण्यात आले आहे, तसेच ज्यांना अद्याप कोणतीही सूचना मिळालेली नाही, असे सर्व कर्मचारी उच्च पेन्शनसाठी पात्र आहेत. त्यांनी सातारा जिल्हा बँकेतील सुमारे 500 सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना नुकताच उच्च पेन्शनचा लाभ मिळाल्याचे उदाहरण देत अहिल्यानगर जिल्ह्यातील सेवानिवृत्तांनाही हा लाभ निश्‍चितपणे मिळू शकतो, असा विश्‍वास व्यक्त केला.


या प्रसंगी जिल्हा सहकारी बँकेचे जनरल मॅनेजर जयंत देशमुख यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आश्‍वस्त करत सांगितले की, उच्च पेन्शनच्या प्रकरणात जिल्हा बँक सर्वतोपरी सहकार्य करेल. यासाठी संबंधित ईपीएस-95 पेन्शनधारकांनी उच्च पेन्शनसाठीचे आपले अर्ज व आवश्‍यक कागदपत्रे बँकेत पुढील कार्यवाहीसाठी सादर करावीत, असा निर्णय यावेळी घेण्यात आला. बँक प्रशासन आणि संघटना यांच्या समन्वयातून प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.


कार्यक्रमाचे आयोजन टी.एस. उर्फ बाळासाहेब देशमुख यांच्या पुढाकारातून करण्यात आले. त्यांनी स्वागत व पाहुण्यांचा परिचय करून दिला. बैठकीसाठी सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल संघटनेच्या वतीने बँकेचे कार्यकारी संचालक वर्पे व जनरल मॅनेजर जयंत देशमुख यांचे आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *