• Thu. Jan 1st, 2026

अशोकभाऊ फिरोदिया शाळेच्या स्नेहसंमेलनातून उलगडला नात्यातील गोडवा

ByMirror

Dec 15, 2025

नृत्य, नाट्य व भावनिक सादरीकरणातून नात्यांचा सुंदर प्रवास


जीवनात छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि मूल्य अंगीकारा -पोलीस उपाधीक्षक गिरीश वमने

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेजच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन “नात्यातील गोडवा” या संकल्पनेवर उत्साहात पार पडले. आयुष्यात नात्यांचे महत्त्व आणि ज्येष्ठांचा आदर, सन्मान आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे प्रभावीपणे उलगडून दाखवले. मैत्रीचे नाते, बहिण-भावाचे अतूट बंध, आई-वडिलांचे प्रेम तसेच आजी-आजोबांचे मोल विद्यार्थ्यांनी नृत्य, नाट्य व भावनिक सादरीकरणातून मांडले. या कार्यक्रमाने उपस्थित प्रेक्षक व पालकांची मने जिंकली.


स्नेहसंमेलनाचे उद्घाटन पोलीस उपाधीक्षक गिरीश वमने यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले. मोने कला मंदिरात झालेल्या या कार्यक्रमास संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, गौरव फिरोदिया, विश्‍वस्त ॲड. गौरव मिरीकर, सल्लागार मंडळाच्या सदस्या पुष्पा फिरोदिया, सुनीता मुथा, मीना बोरा, माजी मुख्याध्यापिका किशोरी सायमन, विद्यालयाचे प्राचार्य प्रभाकर भाबड, उपप्राचार्य कविता सुरतवाला, माध्यमिक विभाग प्रमुख वैशाली वाघ, प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शर्मा, पूर्व-प्राथमिक विभाग प्रमुख ज्योती सुद्रिक, विद्यार्थी प्रतिनिधी वरद लोखंडे व विद्यार्थिनी प्रतिनिधी श्रावणी देशमुख यांच्यासह सर्व अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


विद्यालयातील विद्याथर्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविकात छायाताई फिरोदिया म्हणाल्या की, शालेय जीवन जीवनातील सोनेरी क्षण असून, विद्यार्थी दशेतच जीवनाचा खरा पाया रोवला जातो. आजच्या आधुनिक युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आपल्यासाठी नक्कीच उपयुक्त आहे; मात्र त्याचा वापर आपल्या जीवनात सकारात्मक आणि योग्य दिशेने होणे अत्यंत आवश्‍यक आहे. आयुष्याच्या योग्य टप्प्यावर योग्य निर्णय घेतले, तर आपले जीवन अधिक यशस्वी, समृद्ध आणि सुंदर घडू शकते. त्यामुळे आयुष्यामध्ये निर्णयक्षमता ही अतिशय महत्त्वाची असून, योग्य निर्णयच आपल्या यशाचा पाया ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.


याप्रसंगी पोलीस उपाधीक्षक गिरीश वमने यांची ओळख मुलाखतीद्वारे करून देण्यात आली. त्यांच्या बालपणाविषयी, शिक्षणप्रवासाविषयी व त्यांनी निवडलेल्या क्षेत्राविषयी विचारलेल्या प्रश्‍नांमधून अक्षरा गांधी व आराध्या तिपुले या विद्यार्थिनींनी प्रमुख पाहुण्यांना प्रभावीपणे बोलते केले. गिरीश वमने म्हणाले की, सोशल मीडियाच्या काळात नवीन-नवीन येणाऱ्या विविध ॲप्सचा वापर विद्यार्थ्यांनी जपून व समजून करावा. चिमुकल्या विद्यार्थ्यांचे खरे आधारस्तंभ म्हणजे त्यांचे आई-वडील असून, विद्यार्थ्यांनी नेहमीच त्यांचा आदर करावा. तसेच शिक्षक हे विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक असल्याने त्यांचाही आदर राखणे तितकेच आवश्‍यक आहे. जीवनात छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांना आदर्श मानून कार्य करत असल्याचे नमूद करत त्यांनी विद्यार्थ्यांनाही त्यांच्या विचारांचा आणि मूल्यांचा अंगीकार करण्याचा संदेश दिला.


यावेळी त्यांनी स्वतःसमोर असणाऱ्या आव्हानांबाबत बोलताना सांगितले की, पोलीस सेवेतील कर्तव्याला कोणताही ठराविक वेळ नसतो. पोलीस अधिकारी हे चोवीस तास कर्तव्यावर असतात. समाजाच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस सेवा देताना येणाऱ्या जबाबदाऱ्या व त्याग याची जाणीव त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. कमी वयात विद्यार्थ्यांवर अधिक जबाबदारी टाकू नका, असा सल्ला पालकांना देऊन, व्यवहार ज्ञान, सायबर क्रार्इम व डिजीटल अरेस्ट बद्दल सावधानता बाळगण्याची माहिती दिली.


पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाची यादी वाचन केदारी आनंदी व पोटे ध्रुवी या विद्यार्थिनींनी केले. प्रथम सत्राचे सूत्रसंचालन नमन समृद्धी व शहा साची यांनी केले, तर आभार वरद लोखंडे व श्रावणी देशमुख या विद्यार्थ्यांनी केले. “नात्यातील गोडवा” या अंतर्गत विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे सूत्रसंचालन वेदिका गुजर व संचित बारसे या विद्यार्थ्यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमास विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नात्यातील गोडवा या संकल्पनेवर स्नेहसंमेलन उत्साहात पार पाडला. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने झाली.


रोप मल्लखांबच्या चित्तथरारक कवायतींनी वेधले लक्ष
स्नेहसंमेलनात रौप मल्लखांबावर चित्तथरारक कवायती रंगल्या होत्या. मुला-मुलींनी रोप मल्लखांबावर चित्तथरारक खेळाचे प्रदर्शन घडवून उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेतून शारीरिक लवचिकता व चपळपणाचा उत्कृष्ट खेळ पहावयास मिळाला. तर रोप मल्लखांबावर खेळाडूंनी विविध धाडसी प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या ह्रद्याचा ठोका चुकवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *