• Thu. Jan 1st, 2026

‘आई’ विषयावर 1121 कवितांचा काव्यग्रंथ 14 डिसेंबर रोजी होणार प्रकाशित

ByMirror

Dec 11, 2025

मातृवंदनेचा रंगणार सोहळा; 500 कवींनी साकारला ऐतिहासिक काव्यसंग्रह


मातृमहिमेचा जागर; 14 डिसेंबरला पुण्यात काव्यग्रंथ प्रकाशन व राज्यस्तरीय कवी महोत्सव

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मातृत्वाच्या अथांग भावविश्‍वाला साहित्यातून वंदन करण्याचा ऐतिहासिक उपक्रम साई इंडियन ट्रस्ट असोसिएशन (सीता ट्रस्ट)च्या माध्यमातून साकारला जात असून, ‘आई’ या पवित्र विषयावर 1121 कवितांचा भव्य काव्यग्रंथ 14 डिसेंबर रोजी पुण्यात प्रकाशित केला जाणार आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील नामवंत कवींच्या कवितांचा देखील समावेश आहे. तर यावेळी राज्यस्तरीय कवी महोत्सवाचे देखील रंगणार आहे.


संस्थेचे अध्यक्ष सी.ए. प्रा. शंकर अंदानी यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात प्रथमच असा भव्य काव्यसंग्रह साकारला जात आहे. हा काव्यग्रंथ मातृभक्त प्रा. (सी.ए.) डॉ. शंकर अंदानी यांनी संकल्पित, संकलित आणि संपादित केला आहे. राज्यभरातील तब्बल 500 हून अधिक कवींनी सादर केलेल्या 1121 कवितांचे संकलन करीत हा अनोखा साहित्यिक खजिना तयार करण्यात आला आहे. ‘आई’ या एकमेव भावपूर्ण विषयावर इतक्या मोठ्या प्रमाणात कवितांचा संग्रह आजवर कधीही प्रकाशित झालेला नाही. मातृत्वाचा साज, त्याग, वात्सल्य, संस्कार आणि भावनांचा अजरामर ठसा उमटविणारा हा ग्रंथ महाराष्ट्राच्या साहित्य, सांस्कृतिक वारशात भर घालणार आहे.


या ऐतिहासिक प्रकाशन सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून, यामध्ये महामंडलेश्‍वर श्रीकृष्णगिरीजी महाराज, 1008 महामंडलेश्‍वर श्री दत्तात्रय दहिवळ महाराज, पद्मश्री दादासाहेब इदाते, पद्मश्री माजी खासदार विकास महात्मे, पद्मश्री उदय देशपांडे, पद्मश्री राहीबाई पोपरे, पद्मश्री पोपटराव पवार, राज्यसभा खासदार मेघाताई कुलकर्णी, खासदार नीलेश लंके, आमदार संग्राम जगताप यांचा समावेश आहे. तसेच राज्यातील नामांकित साहित्यिक, पत्रकार व सुमारे 250 कवी उपस्थित राहणार आहेत.


हा कार्यक्रम रविवार, दिनांक 14 डिसेंबर रोजी पुणे येथील वि.का. राजवाडे सभागृह, इतिहास संशोधन मंडळ, सदाशिव पेठ येथे आयोजित करण्यात आला असून साहित्यप्रेमी, कवी, अभ्यासक, समाजकार्यकर्ते आणि रसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांद्वारे करण्यात आले आहे. याच कार्यक्रमात राज्यस्तरीय कवी महोत्सव, तसेच 21 आदर्श माता सन्मान आणि 11 मान्यवर ज्येष्ठ साहित्यिकांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मातृत्व, साहित्य आणि संस्कृतीचा अनोखा संगम या कार्यक्रमातून घडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *