वासन टोयोटा आणि घर घर लंगरसेवेच्या वतीने 80 ब्लँकेट वाटप
उपेक्षित घटकांना आधार देणे म्हणजे खरी समाजसेवा -जनक आहुजा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अंध, अपंग आणि मुकबधीर मुला-मुलींसाठी आधार ठरलेल्या निंबळक येथील अनामप्रेम संस्थेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना थंडीच्या पार्श्वभूमीवर केडगाव येथील वासन टोयोटा आणि घर घर लंगर सेवा यांच्या वतीने ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात एकूण 80 दिव्यांग विद्यार्थ्यांना ब्लँकेट देऊन सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
या ब्लँकेट वाटप कार्यक्रमाला जनक आहुजा, प्रितपालसिंग धुप्पड, राजेंद्र कंत्रोड, मुन्नाशेठ जग्गी, संजय आहुजा तसेच अनामप्रेम संस्थेचे प्रवीण नवले उपस्थित होते.
जनक आहुजा म्हणाले की, वासन टोयोटा आणि घर घर लंगरसेवा सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन योगदान देत आहेत. समाजातील उपेक्षित घटकांना आधार देणे म्हणजे खरी समाजसेवा आहे. अनामप्रेम संस्था गेली 18 वर्षे दिव्यांग मुलांच्या पुनर्वसनासाठी, शिक्षणासाठी आणि त्यांना दिशा देण्याचे कार्य करत आहे. अशा संस्थांना हातभार लावणे ही सर्वांची जबाबदारी आहे. वाढती थंडी पाहता दिव्यांगांना उबदार वस्त्रांची गरज लक्षात घेऊन हा उपक्रम राबवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
अनामप्रेम संस्थेचे प्रवीण नवले यांनी वासन टोयोटा आणि घर घर लंगर सेवेचे आभार मानत म्हटले की, समाजातील सजग नागरिकांनी दिलेला हा हात आम्हाला बळ देणारा आहे. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा सर्वात मोठा समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.
