पावसाच्या रिमझिममध्ये दाखल झालेल्या वारकरींमुळे वातावरण प्रफुल्लित
राष्ट्रवादीच्या नेते हातात टाळ व डोक्यावर पादुका घेऊन दिंडीत सहभागी
अहमदनगर (प्रतिनिधी)- पंढरीच्या वारीसाठी निघालेल्या श्री संत जनार्दन स्वामी महाराज (पालखी) पायी दिंडीचे भिंगारमध्ये आगमन होताच भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने गुरुवारी (दि.23 जून) संध्याकाळी भक्तीमय वातावरणात जय हरी विठ्ठल.. श्री हरी विठ्ठलच्या गजरात स्वागत करण्यात आले. संध्याकाळी पावसाची सुरु झालेली रिमझिम मध्ये दाखल झालेल्या वारकरींमुळे वातावरण प्रफुल्लित झाले होते.
दिंडीच्या स्वागतासाठी हजर असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर व राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी टाळ घेऊन जय हरी… विठ्ठलचा गजर करत दिंडीत सहभाग नोंदवला. भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी रथातील पादुका डोक्यावर घेऊन परिसरातून मिरवल्या. दिंडीतील वारकर्यांनी पुंडलीक वरदा हरी विठ्ठल… श्री ज्ञानदेव तुकारामचा जयघोष केला. यावेळी राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अनंत गारदे, युवक उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, रमेश वराडे, सर्वेश सपकाळ, महेश खोमणे, दीपक बडदे, प्राचार्य कैलास मोहिते, नाथजी राऊत, दिलीप ठोकळ, ह.भ.प. रावसाहेब झावरे, ह.भ.प. गंगाराम मुंडे, संतोष हजारे, मनोहर दरवडे, दीपक धाडगे, सतीश सपकाळ, मच्छिंद्र बेरड, प्रसाद मुंडे, सदाशिव मांढरे, असलम शेख, मनसाराम रवेलिया, योगेश करांडे, फैय्याज शेख आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
दादाभाऊ कळमकर व प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते पादुकांचे पूजन करण्यात आले. दिंडीचे प्रमुख ह.भ.प.उद्धव महाराज आनंदे यांचा ह.भ.प. झावरे व ह.भ.प. मुंडे यांनी सत्कार केला. प्रास्ताविकात संजय सपकाळ यांनी या दिंडीचे दरवर्षी मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने स्वागत करण्यात येते. मागील दोन वर्ष कोरोनामुळे खंड पडला. मात्र यावर्षी पुन्हा उत्साहाने दिंडीचे स्वागत करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
आनंदेवाडा श्रीक्षेत्र देवगिरी-दौलताबाद (जि. औरंगाबाद) येथून श्री संत जनार्दन स्वामी महाराज (पालखी) पायी दिंडी आषाढी वारीसाठी निघाली आहे. दिंडीचे भिंगारमध्ये मोठ्या भक्तीभावाने स्वागत करण्यात येते. नगर-करमाळा मार्गे ही दिंडी पंढरपूरला प्रस्थान करणार आहे. दिंडीला 112 वर्षाची परंपरा असून, हा पालखी सोहळा आजतागायत सुरू असल्याची माहिती ह.भ.प.उद्धव महाराज आनंदे यांनी दिली. वारकर्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.