• Sun. Jun 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

बाजार समितीतील 25 लाखांच्या गैरव्यवहाराच्या आरोप प्रकरणी पुरावे नष्ट केल्याची तक्रार

ByMirror

Nov 28, 2025
दिवाळी बोनसच्या आडून 25 लाखांचा कथित आर्थिक गैरप्रकार झाल्याचा आरोप

कर्मचाऱ्यांवर दबाव, अर्ज बदलल्याचा आरोप; आर्थिक गुन्हे शाखेकडे कर्मचाऱ्याचे निवेदन


सचिवांनी भ्रष्टाचार दडपण्यासाठी आजारपणासाठी मदतीचे अर्ज अतिवृष्टीत नुकसानीसाठी बदलल्याचे आरोप

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल 25 लाख रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचे पुरावे नष्ट केल्याचा गंभीर आरोप बाजार समितीचे गेटमन सुलक्षण लक्ष्मण मेहेत्रे यांनी केला असून याबाबत त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपाधीक्षक यांच्याकडे निवेदन सादर करून तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.


सुलक्षण मेहेत्रे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, गुरुवारी, दि. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सर्व कर्मचाऱ्यांना काम सोडून अचानक बैठकीस बोलावण्यात आले. या बैठकीत सचिव, सहसचिव, पर्यवेक्षक, निरीक्षक यांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना दडपण टाकल्याचा आरोप आहे.


निवेदनात म्हटले आहे की, आधी आजी/आजोबा, जवळचे नातेवाईक यांच्या उपचारासाठी सहानुभूती म्हणून घेतलेल्या 15 दिवसांच्या पगारातील कपातीला, आता खोट्या पद्धतीने शेळ्या, मेंढ्या, गायी, म्हशी, कोंबड्या यांच्या नुकसानीसाठी दिला असल्याचे दाखवण्यात आले. तसेच ज्यांच्या नावाने 25 लाखांची मदत दाखवण्यात आली त्या तिन्ही कर्मचाऱ्यांच्या नावाने बनावट अर्ज तयार करून 25 लाखांची रक्कम वितरित दाखवली गेली, असा आरोप मेहेत्रे यांनी केला.


मेहेत्रे यांनी पुढे म्हटले आहे की, जे अर्ज मूळतः आजारपणासाठी मदतीचे होते, ते नंतर अतिवृष्टी व जनावरांच्या नुकसानीसाठी असल्याचे बदलण्यात आले. बँक खात्यात 25 लाख रुपये पाठविल्याचे नवीन पुरावे तयार करून कर्मचाऱ्यांना तेच सांगण्यास भाग पाडले गेले.


“सर्वांच्या सह्या घेण्याची गरज नाही, आम्ही प्रथम पेजवरील मजकूर व अधिकारी वर्गाच्या सह्या करून अर्ज बदलले आहेत,” असे कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले. कर्मचाऱ्यांवर दबाव टाकताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांबद्दलही “पैसे दिले की पोलिस शांत बसतात, तुमच्यापर्यंत पोलिस येणार नाहीत” असे वक्तव्य केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे प्रामाणिक पोलिस दलाची बदनामी झाल्याचे मेहेत्रे यांनी नमूद केले आहे.


मेहेत्रे यांनी सांगितले की, संपूर्ण प्रकरणाचे ध्वनिचित्रफीत व अन्य पुरावे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. पूर्वीचे अर्ज, बदललेली नोंद, प्रोसेडिंग, बँक स्टेटमेंट यांची तपासणी केल्यास भ्रष्टाचार स्पष्ट होईल. सखोल चौकशी व गुन्हा दाखल करण्याची मागणी मेहेत्रे यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे केली आहे. याबाबत 25 लाखांच्या वितरणाचे खरे पुरावे तपासावेत, जनावरांची खरेदी, नैसर्गिक आपत्तीतील नुकसानीचे पंचनामे तपासून सत्यता पडताळावी, बनावट अर्ज, बदललेले पुरावे, नष्ट केलेले रेकॉर्ड तपासावे, सचिव व संबंधित अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, कर्मचाऱ्यांच्या पगारातील केलेली कपात बेकायदेशीर असल्याने ती परत करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे बाजार समितीत भितीचे व तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचेही मेहेत्रे यांनी नमूद केले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *