3 टप्प्यांमध्ये लोणावळा येथे लीग पद्धतीने रंगणार सामने
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (डब्ल्यू.आय.एफ.ए.) व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन (एआयएफएफ) यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र स्टेट यूथ लीग 202526 स्पर्धेसाठी अहिल्यानगर शहरातील 15 वर्षाखालील मुलांचा फिरोदिया शिवाजीयन्स संघ लोणावळा येथे रवाना झाला आहे. ही स्पर्धा सिंहगड कॉलेजच्या मैदानावर खेळवली जात आहे.
फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमीला सलग दुसऱ्यांदा या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाला आहे. लीग पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेचे सामने तीन टप्प्यांत नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी मध्ये खेळवले जातील. या लीगमधील अव्वल दोन संघांना एआयएफएफ आयोजित ‘ऑल इंडिया यूथ लीग’ मध्ये पात्रता मिळते.
संघात अशोक पंढरीनाथ चंद (कर्णधार), चिराग अनिल गोरे, हर्षद संदीप सोनवणे, सौरभ खंडेलवाल, मोक्ष सचिन गरदास, आदर्श साबळे, कृष्णा शरद भिसे, आदित्य गर्जे, आर्यन गौतम सोनवणे, ग्लेन रिची फर्नांडिस, अथर्व सागर गिर्जे, अंशुमन दशरथ विधाते, जोएल महिंद्रा साठे, ओम राजेंद्र लोखंडे, रामचंद्र मोतीराम पालवे, सोहम सौंदुळकर, अभिनव महेश राऊत, हंजला खान, समर्थ बिरुंगी या 19 खेळाडूंचा समावेश आहे.
संघाचे प्रशिक्षक जेव्हिअर स्वामी व सचिन पठारे, संघ व्यवस्थापक महिमा पठारे, तर फिजिओथेरपिस्ट म्हणून डॉ वेदिका दिवे जबाबदारी सांभाळत आहेत. या संघाच्या वाटचालीमागे अकॅडमीचे आधारस्तंभ नरेंद्र फिरोदिया आणि मनोज वाळवेकर यांचे मार्गदर्शन व दृष्टीकोन महत्त्वाचा असून, जिल्ह्यातील युवा फुटबॉलला नवी दिशा देण्याचे ते कायमच प्रयत्न करत आहे.
या संपूर्ण मोहिमेसाठी आय लव्ह नगर आणि ग्रोथ एक्स (बेंगळुरू) या दोन्ही स्पॉन्सर्सचे विशेष सहकार्य लाभले आहे. त्यांच्या उदार समर्थनामुळे फिरोदिया शिवाजीयन्सला राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील मंचांवर पोहोचण्यासाठी मोठा आधार मिळाला आहे. फिरोदिया शिवाजीयन्सच्या प्रगतीसाठी कोअर कमिटी सदस्य पल्लवी सैदाने, सचिन पठारे, अभिषेक सोनावणे, श्रेया सागडे, जेव्हिअर स्वामी आणि राजेश अँथनी योगदान देत असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे अकॅडमीचा पाया अधिक मजबूत बनत आहे. या खेळाडूंना रवाना करताना जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव रोनप फर्नांडिस, उपाध्यक्ष खालिद सय्यद, खजिनदार रिशपालसिंग परमार, सहसचिव प्रदीप जाधव, विक्टर जोसेफ आणि राजू पाटोळे यांनी शुभेच्छा दिल्या.
