कुशल मनुष्यबळ घडविण्यात संस्थेचा मोलाचा वाटा; प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना निरोप
बदलते तंत्रज्ञान व वैद्यकीय साधनांच्या वापरामुळे प्रशिक्षित पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची मागणी – प्रा. बाबूराव कर्डिले
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त कर्डिले ब्युरो नर्सिंग होम संचालित यश पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट व शुभ नर्सिंग कॉलेज (जी.एन.एम.) अहिल्यानगर येथील अनेक विद्यार्थी आरोग्य सेवेत यशस्वीरित्या कार्यरत झाले आहेत. संस्थेने गेल्या बारा वर्षांपासून आरोग्य क्षेत्रासाठी सक्षम, कुशल व तांत्रिकदृष्ट्या प्रगल्भ विद्यार्थी घडविण्याचे कार्य सातत्याने केले असून, आज या विद्यार्थ्यांनी विविध प्रतिष्ठित आरोग्य संस्थांमध्ये नावलौकिक मिळविला असून, संस्थेतील 2024 या बॅचचा निरोप समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.
निरोप समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. बाबूराव कर्डिले होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, आरोग्य क्षेत्राचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. तंत्रज्ञान व वैद्यकीय साधनांच्या वापरामुळे प्रशिक्षित पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यश इन्स्टिट्यूट ही त्या मागणीसाठी प्रशिक्षित, जबाबदार आणि तांत्रिक दृष्ट्या सक्षम विद्यार्थी घडवत आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात संकेत रेवनवर यांनी महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल मध्ये नोंदणी प्रक्रियेविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच प्राचार्या मंगल कर्डिले यांनी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व आरोग्य क्षेत्रातील भविष्यातील संधी या विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमात राहुल भोसले, पठाण सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संस्थेचे विद्यार्थी आज देशभरातील शासकीय, निमशासकीय, नगरपालिका, महानगरपालिका, तसेच एनएबीएच मानांकित रुग्णालये, ब्लड बँक आणि खासगी आरोग्य संस्थांमध्ये जबाबदारीची कामे पार पाडत आहेत. ऑपरेशन थिएटर टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, डायलिसिस टेक्निशियन, कॅथलॅब असिस्टंट, सीटी स्कॅन व एमआरआय टेक्निशियन अशा विविध विभागांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे.
विद्यार्थ्यांपैकी निलेश पंडित, वसंत खंडारे, तृप्ती सुपेकर, शुभम गांगर्डे, प्रियंका पांडव, किरण अहिरे आणि सय्यद हुसेन यांनी आपल्या मनोगतात शिक्षणकाळातील अनुभव, संस्थेतील वातावरण आणि शिक्षकांचे मार्गदर्शन याबद्दल भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमात विविध मैदानी खेळ, मनोरंजनात्मक सादरीकरणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी प्राध्यापक कर्डिले सर आणि कोमल पंचमुख यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजनासाठी ज्योती परभणे यांनी परिश्रम घेतले.
