14 नोव्हेंबरची गुरुवंदना
14 नोव्हेंबर 2025 ही अहिल्यानगर जिल्ह्यासाठी विशेष अशी तारीख आहे. या दिवशी जिल्ह्याचे भूषण असणारे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांचा ‘अमृत महोत्सव सोहळा’ सकाळी 10 वाजता सहकार सभागृहात होत आहे. तुम्हा आम्हा सर्वांसाठी अत्यंत गौरवास्पद आणि अभिमानाचा असा हा क्षण आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने “कुलगुरू”, “शिक्षण आणि विकास” हे दोन ग्रंथ प्रकाशित होत आहेत.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे संस्थापक कुलगुरु डॉ. श्री. एन. के. ठाकरे कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान भूषवित आहेत. विशेष म्हणजे डॉ. निमसे सरांच्या माजी विद्यार्थ्यांनी या सोहळ्याचे आयोजन केले आहे. डॉ. निमसे सर यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि लखनऊ विद्यापीठाचे कुलगुरू पद भूषविलेले आहे.
बऱ्याचदा समाजामध्ये ज्यांचे सत्कार व्हायला पाहिजे, त्यांना दुर्लक्षिले जाते, ज्यांच्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे त्यांचे सत्कार होतात. ही एक शोकांतिकाच आहे. तथापि सुदैवाने कृतज्ञता हा गुण काही प्रमाणात का होईना समाजात शिल्लक आहे. हा गौरव सोहळा, अशा एका शिक्षकाचा आहे की ज्याने गणित या विषयासाठीच आपले आयुष्य झोकून दिले. गणित या विषयात डॉक्टरेट मिळवणे हीच मुळात दुर्मिळ घटना आहे. या विषयात डॉक्टरेट करून आपला कर्तृत्व पताका शिक्षण क्षेत्राच्या विविध विभागात तेजाने फडकावणे याला मोठी जिद्द व कष्ट लागतात.
हा कौतुक सोहळा केवळ डॉ.निमसे सरांचा नाही तर शिक्षण क्षेत्रामध्ये झोकून देऊन काम करणाऱ्या शक्तींचा आणि गुरूंचा हा गौरव आहे. या कार्यक्रमात दहा-बारा आजी – माजी कुलगुरु सहभागी होत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे डॉ.निमसे सर हे महाराष्ट्रात अपवादानेच एकमेव व्यक्ती असू शकतील, की त्यांनी दोन दोन विद्यापीठाचे कुलगुरू पद भूषविले. उभ्या देशाचे प्रेरणास्थान, विश्वाचे प्रेरणास्थान असणारे छत्रपती शिवरायांचा अश्वरूढ पुतळा त्यांनी लखनऊ विद्यापीठाच्या आवारात उभारला. ही त्याच्या कर्तृत्वाची पावतीच आहे.
सरांच्या वयाची पंच्याहत्तरी पूर्ण होत आहे. या निमित्ताने दोन पुस्तकांचे प्रकाशन होत आहे. ही दोनही पुस्तके नक्कीच शिक्षण आणि विकासाच्या क्षेत्रावर एक मार्गदर्शक दीपस्तंभ ठरतील हा विश्वास आहे. हा कौतुक सोहळा शिक्षण क्षेत्रातील सर्व शिक्षण प्रेमींना, सर्व शैक्षणिक कार्यकर्त्यांना अनुभवण्याची एक मोठी संधीच आहे.
भारतीय संस्कृती प्रमाणे गुरुपौर्णिमेला गुरुचे वंदन करतात. गुरुचे पूजन होते. दि.14 नोव्हेंबर 2025, एका अर्थी गुरुपौर्णिमा साकारली जात आहे. या दुर्मिळ योगाचा शिक्षण प्रेमी नक्कीच लाभ घेतील असा माझा विश्वास आहे.
-ॲड. डॉ. विद्याधर उर्फ शिवाजीराव काकडे.
