गुरुनानक देवजी मानवतेचे प्रतीक -संजय सपकाळ
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानक देवजी महाराज यांची 556 वी जयंती (गुरुपूरब) साजरी करण्यात आली. भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे सकाळी आयोजित या कार्यक्रमात हरदिन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ आणि प्रज्योतसिंग सागू यांच्या हस्ते गुरुनानक देवजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या अभिवादन कार्यक्रमासाठी सर्वेश सपकाळ, मेजर दिलीप ठोकळ, सचिन चोपडा, ज्ञानेश्वर अनावडे, रतन मेहेत्रे, दीपकराव धाडगे, जहीर सय्यद, अभिजीत सपकाळ, सुधीर कपाळे, विलास आहेर, अविनाश जाधव, विठ्ठल राहिंज, दिलीप गुगळे, अशोकराव पराते, दीपकराव घोडके, मनोहरराव दरवडे, शशिकांत घिगे, सरदारसिंग परदेशी, संजय भिंगारदिवे, संतोष हजारे, रमेशराव साके, जालिंदर अळकुटे, रवी ताठे, अशोकराव दळवी, अविनाश पोतदार, नवनाथ वेताळ, रामनाथ गर्जे, भरत दंडोरे मेजर, रमेश कोठारी, सुहास देवराईकर, योगेश चौधरी, दशरथराव मुंडे, प्रकाश देवळालीकर, मुन्ना वाघस्कर, देविदास गंडाळ, संतोष रासकर, सुधीर दहिफळे, संजय इस्सर, गोकुळ भांगे आदींसह ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, गुरुनानक देवजी हे केवळ शीख धर्माचे प्रवर्तक नव्हते, तर ते मानवतेचे प्रतीक होते. त्यांनी समाजातील भेदभाव, जातीपातीच्या भिंती दूर करून एक परमेश्वर आणि समानतेचा संदेश दिला. आजच्या काळात त्यांच्या शिकवणीची सर्वाधिक गरज आहे. समाजातील सर्व घटकांनी त्यांच्या विचारांना आत्मसात करून सामाजिक एकता, सद्भावना आणि सेवा या मूल्यांवर चालण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
सचिन चोपडा म्हणाले की, गुरुनानक देवजींनी नाम, दान आणि सेवा हा जीवनाचा मार्ग दाखविला. त्यांचा सरबत्त दा भला म्हणजे सर्वांच्या कल्याणाचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. आपण धर्म, भाषा, पंथ यापेक्षा मानवतेला अग्रक्रम दिला पाहिजे. गुरुनानक देवजींचे जीवन म्हणजे प्रेम, करुणा आणि शांततेचा दीपस्तंभ आहे. त्यांच्या विचारांवर चालणे म्हणजेच खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या जयंती सोहळ्याप्रसंगी ज्ञानेश्वर अनावडे, विलासराव आहेर, प्रज्योतसिंग सागू यांनीही आपल्या भाषणातून गुरुनानक देवजींच्या शिकवणीचे स्मरण केले. तर गुरुनानक देवजींच्या विचारांचे समाजात जागर करुन समतेचा संदेश देण्यात आला.
