स्ट्राँग वुमन ऑफ महाराष्ट्र किताबाने गौरव
राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडरेशन व ॲमेचर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन (महाराष्ट्र) च्या वतीने नुकत्याच मुंबई, येथे क्लासिक स्टेट पॉवरलिफ्टिंग व डेडलिफ्ट चॅम्पियनशिप ही राज्यस्तरीय स्पर्धा पार पडली. यामध्ये शहरातील अनुराधा मिश्रा यानी उत्कृष्ट कामगिरी करुन चार सुवर्ण पदक पटकाविले. त्यांची राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
ही स्पर्धा सबज्युनिअर, ज्युनिअर, सिनीयर व मास्टर गटात पार पडली. यामध्ये महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. महिलांच्या सिनीयर गटात पॉवरलिफ्टिंग व डेडलिफ्ट प्रकारात मिश्रा यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करुन सुवर्ण पदकांची कमाई केली. त्यांना यावेळी स्ट्राँग वुमन ऑफ महाराष्ट्र किताबाने गौरविण्यात आले.
मिश्रा यांना नुकतेच झालेल्या सदर स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे अध्यक्ष तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते तुषार दारकर, सचिव तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते संतोष शिंदे, राष्ट्रीय पंच निशा शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मिश्रा या सावेडी येथील जिम स्ट्राईकर मध्ये प्रशिक्षक स्वप्निल मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. या यशाबद्दल अनुराधा यांचे वडिल श्रीनिवास तिवारी यांनी मुलीच्या कामगिरीबद्दल विशेष शुभेच्छा दिल्या. तर त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
