दिवाळीचा गोडवा द्विगुणीत करण्यासाठी रूचकर दिवाळी फराळ विक्रीला सुरूवात; फराळ महोत्सवाची तपपूर्ती
केवळ सेवा नाही, तर प्रेमाचा प्रसाद -उमेश पगारिया
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्यांच्या दिवाळीला गोडवा आणि आनंदाची सरिता मिळावी, या हेतूने जैन सोशल फेडरेशन संचलित भगवान महावीर भवनात सलग 12 व्या वर्षी दिवाळी फराळ महोत्सवाला प्रारंभ झाला. या महोत्सवाचे उद्घाटन नागपूर येथील नामवंत उद्योजक उमेश पगारिया यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी पोपटलाल सुराणा, बसंतीलालजी गोलेचा (नागपूर), केसरीमलजी छाजेड, जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा, सतीश बोथरा, सतीश लोढा, मिलापचंद पटवा, अमित पटवा, रुपेश पटवा, प्रकाश पटवा, आनंदऋषीजी नेत्रालय मेडिकलचे संचालक डॉ. अशोक महाडिक, गिरीश गांधी, तुषार मुनोत, आर्यन पटवा व अर्पित पटवा आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात मिलापचंद पटवा म्हणाले की, सर्वसामान्यांना घरगुती दर्जाचा, हायजेनिक आणि स्वादिष्ट फराळ सहज मिळावा या हेतूने ही संकल्पना राबवली आहे. कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या असल्या तरी, आम्ही ना नफा ना तोटा तत्त्वावर फराळ विक्री करत आहोत. बुंदीचे लाडू, मसाला शेव, चिवडा, शंकरपाळे, सोनपापडी हे सर्व फक्त 150 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहेत. नगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसादच या उपक्रमाला आज 12 वर्षांचा सुवर्ण प्रवास घडवून आणत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संतोष बोथरा म्हणाले की, आचार्यश्री आनंदऋषीजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि प्रबुद्ध विचारक आदर्शऋषीजी महाराज यांच्या प्रेरणेने आम्ही हा उपक्रम सुरू केला. हे केवळ फराळ विक्रीचे ठिकाण नाही, तर सेवा आणि आपुलकीचा प्रसाद आहे. प्रत्येक ग्राहकाच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, त्याच्या डोळ्यातील चमक हीच आमच्यासाठी खरी कमाई असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्योजक उमेश पगारिया म्हणाले की, दिवाळी म्हणजे केवळ दिवे आणि फटाके नव्हेत; ती म्हणजे मनं जोडणारा, प्रेम आणि आपुलकीचा सण. महावीर भवनात चालणारा हा फराळ महोत्सव या सणाला खरी सामाजिक जोड देतो. मागील 12 वर्षांपासून हे कार्य ज्या सातत्याने आणि निष्ठेने सुरू आहे, ते पाहून मन आनंदित होतं. ना नफा, ना तोटा! या तत्त्वावर सर्वसामान्यांना दर्जेदार फराळ मिळवून देणं ही खऱ्या अर्थाने सामाजिक भावना आहे. आजच्या युगात नफ्याच्या स्पर्धेतही अशा सेवा उपक्रमांनी समाजात विश्वास, संवेदना आणि मानवतेचा जिव्हाळा जिवंत ठेवला आहे. या उपक्रमाद्वारे सकारात्मक ऊर्जा पसरते आणि अनेकांना प्रामाणिकपणे काम करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे ते म्हणाले.
संपूर्ण फराळ उच्च प्रतीच्या किराण्यापासून आणि हायजेनिक वातावरणात तयार करण्यात आला आहे. नगरकरांना चांगल्या दर्जाचा फराळ मिळावा म्हणून आमची संपूर्ण टीम दिवस-रात्र परिश्रम घेत आहे. 12 वर्षांपूर्वी सुरू केलेला हा उपक्रम नगरकरांच्या प्रेमामुळे यशस्वीपणे पुढे सुरु असल्याचे रुपेश पटवा आणि अमित पटवा यांनी सांगितले.