गुरुद्वारा भाई दया सिंहजी गोविंदपुरा येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी
हिंद की चादर! श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350 व्या शहीदी शताब्दीचा उपक्रम
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हिंद की चादर! श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350 व्या शहीदी शताब्दी निमित्त अहिल्यानगर येथे नगर कीर्तन यात्रेचे बुधवारी (दि.8 ऑक्टोंबर) मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. गुरुद्वारा भाई दया सिंहजी गोविंदपुरा यांच्या वतीने जंगी स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पारंपारिक ढोल-ताशाच्या गजरात व फुलांच्या वर्षावाने या यात्रेचे स्वागत झाले.
देशभरातून निघालेल्या ऐतिहासिक शहीदी नगर कीर्तन यात्रेचे शहरात झालेल्या आगमनाने भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात निर्माण झाले होते. ही पवित्र यात्रा गुरुद्वारा धुबरी साहेब आसाम येथून प्रारंभ झाली असून, भारतातील 23 राज्यांमधून प्रवास करून श्री आनंदपुर साहेब पंजाब येथे समारोप होणार आहे.
या यात्रेमध्ये श्री गुरु ग्रंथ साहेबजींचे पवित्र स्वरूप तसेच गुरु साहिबान यांच्या ऐतिहासिक शस्त्र विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले. ही यात्रा बुधवारी छत्रपती संभाजीनगर येथून प्रस्थान करून दुपारी शेंडी बायपास चौक येथे पोहोचली. तेथे यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले आणि त्यानंतर बाईक व कार रॅलीच्या स्वरूपात डीएसपी चौका पर्यंत आली. डीएसपी चौक ते गुरुद्वारा भाई दया सिंहजी गोविंदपुरा पर्यंत वाजत-गाजत यात्रा पायी नेण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी भाविकांना प्रसादचे वाटप करण्यात आले. मार्गावर अनेक ठिकाणी विविध धर्माच्या नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने यात्रेचे स्वागत केले. तसेच शीख समाजातील युवकांनी लाठी-काठी, तलवार आदी पारंपारिक शस्त्राने युध्द कलेचे धाडसी प्रात्यक्षिक सादर केले. या माध्यमातून एकतेचा सौहार्दाचा आणि धार्मिक सहिष्णुतेचा संदेश देण्यात आला. गुरुद्वारा येथे कीर्तन यात्रा पोहोचली असता, शहरातील मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी कथा, कीर्तन आणि लंगर सेवा पार पडली. गुरु साहिबान यांच्या ऐतिहासिक शस्त्रांचे आणि गुरुग्रंथ साहेबजींचे भाविकांनी दर्शन घेतले.
या ऐतिहासिक नगर कीर्तनाच्या यशस्वी आयोजनासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम जगताप तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महापालिका आयुक्त व जिल्हा प्रशासन यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल गुरुद्वारा समितीच्या वतीने त्आभार व्यक्त करण्यात आले. या यात्रेच्या दर्शनासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांनी उपस्थिती लावली होती.
शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष हरजींदर सिंग धामी, जगदेव सिंग, रामसिंग बॉम्बे, तसेच जथ्थेदार बाबा रणजीत सिंगजी गुपतसर मनमाड यांच्या सहकार्याने उपस्थितीबद्दल विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
गुरुद्वारा भाई दया सिंहजी गोविंदपुरा आणि शीख समाजाचे अध्यक्ष बलदेवसिंह वाही, सचिव सतिंदरसिंग नारंग तसेच सर्व समिती सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली या ऐतिहासिक शताब्दी समागमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शीख समाज बांधवांनी परिश्रम घेतले.
अध्यक्ष बलदेवसिंग वाही म्हणाले की, ही यात्रा हिंद की चादर श्री गुरुतेग बहादूर साहेबजी यांच्या बलिदानाचा आणि धर्म स्वातंत्र्याच्या संदेशाचा प्रचार करणारी आहे. अहिल्यानगर मधील संगतने आज अद्वितीय श्रद्धा, एकता आणि सौहार्दाचा आदर्श निर्माण केला आहे. ही यात्रा सायंकाळी गोविंदपुर येथून पुढील प्रवासासाठी राहुरी-श्रीरामपूर मार्गे मनमाड कडे प्रस्थान झाली आहे.