यात्रेनिमित्त दर्शनाला गर्दी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. नवरात्रातील सातव्या माळेला, रविवारी (दि. 28 सप्टेंबर) यात्रेनिमित्त दर्शनासाठी हजारो भाविकांची मांदियाळी उसळली. रिमझिम पावसातही भाविकांचा उत्साह कमी न होता मंदिर परिसर भक्तिभावाने गजबजून गेला.

नवरात्राच्या पहिल्या दिवसापासूनच भाविकांची गर्दी वाढू लागली होती. सातव्या माळेला यात्रेनिमित्त भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या तर संध्याकाळी आरतीच्या वेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. शहरासह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. दर्शनासाठी महिला व पुरुषांच्या स्वतंत्र रांगांची व्यवस्था करण्यात आली होती. तर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने संपूर्ण मंदिर परिसरात सीसीटिव्ही बसविण्यात आले असून, पोलीस, स्वयंसेवक व होमगार्ड बंदोबस्ताला उपस्थित होते.
देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवरात्रोत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरासमोरील मैदानात आकर्षक पाळणे उभारले असून, बालगोपाळांसह भाविक त्याचा आनंद घेत आहेत. परिसरात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल, मुलांसाठी खेळणी, महिलांसाठी विविध साहित्यांची दुकाने यामुळे यात्रेच्या ठिकाणी गजबजलेले वातावरण निर्माण झाले होते.
नवरात्रोत्सवाची यशस्वी व्यवस्थापनासाठी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, सचिव दत्तात्रय विटेकर, खजिनदार एकनाथ वाघ, विश्वस्त राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, गणेश कातोरे, महेश सप्रे, सचिन कोतकर आदी पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत.
