सात वर्षांपासून पीडित कुटुंबीय भरपाईच्या प्रतीक्षेत
एचपी गॅस कंपनी व एजन्सीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर येथे 2017 मध्ये झालेल्या हिंदुस्तान पेट्रोलियम गॅस टाकी गळती व स्फोट दुर्घटनेतील पीडितांना नुकसानभरपाई मिळावी, तसेच जबाबदार गॅस कंपनी व स्थानिक एजन्सीवर गुन्हा दाखल व्हावा, यासाठी सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.
छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद साळवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उपोषणात प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे पाटील, धडक जनरल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीधर शेलार, मालनताई जाधव, दत्ता वामन, प्रमोद जौंजाळ, कविता जौंजाळ, सचिन जौंजाळ, नंदाबाई शेंडे, सोनल जौंजाळ, विशाल जगताप, सिद्धांत पाटोळे, पोपट दोंदे, विजय लोंढे आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
श्रीरामपूर येथे 24 डिसेंबर 2017 रोजी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन कंपनीच्या गॅस टाकीची गळती होऊन मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत पाच कुटुंबीयांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. गौरव बागुल, चंद्रकांत जौंजाळ, सचिन जौंजाळ, प्रमोद जौंजाळ, मधु बागुल या कुटुंबांचे घरगुती साहित्य, मंडप डेकोरेशन साहित्य, डीजे सिस्टीमसह महागडे साहित्य जळून खाक झाले.
दुर्घटनेनंतर पोलिस, तहसीलदार, तलाठी यांनी पंचनामा केला होता; ग्रामपंचायत दत्तनगर व श्रीरामपूर नगरपरिषदेचे अग्निशमन दल यांनीही दाखला दिला होता. आग विझवण्यासाठी जवळपास एक तास प्रयत्न झाले असून अग्निशमन दलानेच पीडितांकडे बिल मागितल्याचेही निवेदनात नमूद आहे.
या दुर्घटनेत सदर कुटुंबीय पूर्णपणे उद्ध्वस्त झाले, मात्र सात वर्षांनंतरही त्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. गॅस कंपनी व स्थानिक एचपी गॅस एजन्सीवर गुन्हा दाखल करून परवाना रद्द करावा, पीडित कुटुंबांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी संघटनेने केली आहे. तसेच यापूर्वी करण्यात आलेल्या उपोषणानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिले तरी प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालेली नाही. मागासवर्गीय पीडित कुटुंबीयांची उपेक्षा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.