फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा
14 व 16 वर्ष वयोगटात (मुले) आर्मी पब्लिक स्कूलची अंतिम सामन्यात धडक
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी (दि.26 सप्टेंबर) तिसऱ्या क्रमांकासाठी व उपांत्य फेरीतील रंगतदार सामने झाले. या स्पर्धेत 17 वर्षा आतील मुलींमध्ये आठरे पाटील स्कूल व 12 वर्ष वयोगटात (मुले) आर्मी पब्लिक स्कूलने विजय मिळवून तिसरे स्थान निश्चित केले. तर 14 व 16 वर्ष वयोगटात (मुले) आर्मी पब्लिक स्कूलने विजय मिळवून अंतिम सामन्यात धडक मारली आहे.
श्री साई स्कूल विरुध्द आठरे पाटील स्कूल मध्ये गुरुवारी संध्याकाळी उपांत्यपूर्व फेरीतील झालेला सामना अंधारामुळे थांबविण्यात आला होता. हा सामना शुक्रवारी (दि.26 सप्टेंबर) सकाळी घेण्यात आला. यामध्ये आठरे पाटील स्कूलच्या संघाने दमदार खेळी करुन 7-0 गोलने विजय मिळवला. यामध्ये भानूदास चंद याने (6, 20, 25, 39, 40 व 58 व्या मिनीटाला अनुक्रमे 6 गोल) गोलची हॅट्रीक केली. आदित्य भडोरीया याने 53 व्या मिनीटाला 1 गोल केला.
14 वर्ष वयोगटात (मुले) तक्षिला स्कूल विरुध्द सेक्रेटहार्ड कॉन्व्हेंट स्कूलमध्ये रंगतदार सामना पहावयास मिळाला. यामध्ये दोन्ही संघांनी 1-1 गोल केल्याने हा सामना बरोबरीत राहिला. यामध्ये चिरायू लोढा (तक्षिला) याने 45 व हर्षद सोनवणे (सेक्रेटहार्ड कॉन्व्हेंट) याने 20 व्या मिनीटाला प्रत्येकी 1 गोल केला होता. शेवटी टायब्रेकरने 4-3 गोलने तक्षिला स्कूलने विजय संपादन केले.
17 वर्षा आतील मुलींमध्ये तृतीय क्रमांकासाठी पोदार स्कूल विरुध्द आठरे पाटील स्कूलमध्ये झालेल्या सामन्यात आठरे पाटील स्कूलने 0-3 गोलने विजय मिळवला. यामध्ये आठरे पाटील कडून निलम पवार हिने दुसऱ्या व 17 व्या मिनीटाला एकूण 2 गोल केले. वेदिका ससे हिने 19 व्या मिनीटाला 1 गोल केला.
12 वर्ष वयोगटात (मुले) तृतीय क्रमांकासाठी आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात 2-1 गोलने आर्मी पब्लिक स्कूलने विजय मिळवला. यामध्ये आर्मी पब्लिक स्कूलचा खेळाडू रिषभ कातोरे 9 व्या मिनीटाला व आदित्य रेड्डी याने 37 व्या मिनीटाला प्रत्येकी 1 गोल केला. तर ऑक्झिलियम कॉन्व्हेंट कडून 39 व्या मिनीटाला वेदांत बांगर याने 1 गोल केला.
दुपारच्या सत्रात उपांत्य फेरीतील सामने रंगले होते. 14 वर्ष वयोगटात (मुले) प्रवरा पब्लिक स्कूल विरुध्द आर्मी पब्लिक स्कूल यांच्यात झालेल्या सामन्यात आर्मी पब्लिक स्कूलने 2-1 गोलने विजय मिळवला. प्रवरा पब्लिक स्कूलचा खेळाडू जतीन गायकवाड याने दुसऱ्या मिनीटाला गोल करुन दबाव निर्माण केला. मात्र आर्मी पब्लिक स्कूलच्या आशिष शेळके याने 15 व्या मिनीटाला व प्रथमेश लहाडे याने 34 व्या मिनीटाला गोल करुन विजय निश्चित केला.
16 वर्ष वयोगटात (मुले) प्रवरा पब्लिक स्कूल विरुध्द आर्मी पब्लिक स्कूलचा सामना देखील थरारक पध्दतीने रंगला होता. प्रवरा पब्लिक स्कूल कडून पवन वाणी (29 मिनीट) व मयूर पाटील (39 मिनीट) प्रत्येकी 1 गोल केला. तर आर्मी पब्लिक स्कूल कडून प्रतिक शेळके (22 मिनीट) व प्रज्वल (55 मिनीट) गोल करुन दोन्ही संघांनी 2-2 गोलने बरोबरी साधली. टायब्रेकरने आर्मी पब्लिक स्कूलने 4-2 गोलने विजय मिळवला.