पाचीमहादेव मंदिर परिसरात केलेल्या उपोषणाला ग्रामस्थांचा पाठिंबा; तिसऱ्या दिवशी उपोषण सुटले
पर्यावरणात केलेल्या हस्तक्षेपाने अतिवृष्टी व ढगफुटी मानवनिर्मित -गोरक्षनाथ गवते
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांना शिक्षण व उच्चशिक्षण कायमस्वरूपी मोफत मिळावे आणि पर्यावरण संरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या मागणीसाठी पर्यावरण रक्षक गोरक्षनाथ विश्वनाथ गवते यांनी राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील परिसरात उपोषण केले.
सोमवारी (दि. 22 सप्टेंबर) सुरु झालेल्या या उपोषणाची बुधवारी (दि. 24 सप्टेंबर) तिसऱ्या दिवशी सांगता झाली. वांबोरी विभागाचे सर्कल तेजपाल शिंदे व तलाठी गीते यांच्या माध्यमातून हे उपोषण सोडविण्यात आले. यावेळी पोपटराव पटारे, बाबासाहेब मंडलिक, बाळासाहेब पटारे, बाळासाहेब कुऱ्हे, महेश जमदाडे, पप्पू सातपुते, खंडू भाऊ तिडके, सिताराम मंडलिक, महेश मंडलिक, नवनाथ गवते, सचिन मकासरे, पोपट चोथे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
गोरक्षनाथ गवते हे 2011 पासून पर्यावरण रक्षक उपक्रम सातत्याने राबवीत आहेत. त्यांच्या मोहिमांतर्गत एक विद्यार्थी एक झाड, एक व्यक्ती एक झाड, कुऱ्हाडबंदी, डी.जे. बंदी, हुंडाबंदी, व्यसनबंदी, प्लास्टिकबंदी, शिकारबंदी, खाजगी सावकारकी बंदी, भ्रष्टाचारबंदी, अशा अनेक जनजागृती उपक्रमांचा समावेश आहे.
याशिवाय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त गाव, घर तेथे शौचालय, विषमुक्त शेती, रोगमुक्त भारत, पाणी आडवा पाणी जिरवा, बेटी बचाव बेटी पढाव अशी अनेक अभियानं त्यांनी राबवली आहेत. जिल्हा परिषदेपासून महाविद्यालयांपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी प्रेम आणि जिव्हाळा निर्माण करणे हेच माझे ध्येय आहे. आजचा विद्यार्थी उद्याचा पर्यावरण रक्षक नागरिक होईल, अशी जाणीव शाळा-कॉलेजच्या माध्यमातून रुजविणे गरजेचे असल्याचे गवते यांनी म्हंटले आहे.
पुढे जागतिक पर्यावरण विकास सरकारचे राष्ट्रीय अध्यक्ष गोरक्षनाथ गवते यांनी सांगितले की, आज काही भागात भीषण दुष्काळ तर काही भागात ढगफुटीमुळे भयंकर हानी झाली आहे. अनेक कुटुंबे बेघर झाली, शेतकरी हवालदिल झाले. ही परिस्थिती मानवनिर्मित आहे कारण आपणच निसर्गाच्या नियमांमध्ये हस्तक्षेप केला. जर अशी आपत्ती टाळायची असेल तर आपण पर्यावरणाचे रक्षण करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.