मंगळवारी रंगणार माता की चौकी, तर 1 ऑक्टोबरला पुर्णाहूती यज्ञ
भाविकांना धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपुरा येथील राधा-कृष्ण मंदिरात विधीवत पूजा करुन सोमवारी (दि.22 सप्टेंबर) सकाळी उत्साहात घटस्थापना करण्यात आली. नवरात्र उत्सवानिमित्त राधा-कृष्ण मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता व सर्व विश्वस्तांच्या हस्ते घटस्थापना झाली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शीख, पंजाबी भाविकांनी देवीचा जयघोष केला. गेल्या 59 वर्षापासून मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त घटस्थापना करुन विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या वर्षी दररोज महिला मंडळाच्या वतीने संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत किर्तन होणार आहे. तर दररोज संध्याकाळी 7 वाजता मातेची आरती होणार आहे. नवरात्रनिमित्त मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करुन विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
मंगळवारी (दि.23 सप्टेंबर) रात्री 8 वाजता माता की चौकीचा कार्यक्रम होणार आहे. बबलू दुग्गल जागरण मंडळीचे कलाकार देवीचे भक्तीगीत सादर करणार आहे. यानंतर यजमान योगेश धुप्पड परिवाराच्या वतीने आरती होणार असून, आरतीनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी दि. 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता महिला भजन मंडळीच्या उपस्थितीमध्ये पूर्णाहुति यज्ञ संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन राधा-कृष्ण मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
