• Wed. Nov 5th, 2025

एमआयडीसी येथील श्री रेणुका माता देवस्थानात आमदार जगताप दांम्पत्यांच्या हस्ते घटस्थापना

ByMirror

Sep 22, 2025

संबळ-डफच्या निनादात रेणुका मातेचा जयघोष


मंदिर परिसरात रोषणाईची सजावट; नवरात्रोत्सवाची भक्तिमय सुरुवात

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान येथे शारदीय नवरात्र उत्सवाची मंगल सुरुवात सोमवारी (दि. 22 सप्टेंबर) आमदार संग्राम जगताप व माजी नगरसेविका सौ. शितलताई जगताप यांच्या हस्ते विधीवत पूजा व घटस्थापनेने झाली. यावेळी मंत्रोच्चार व धार्मिक विधीने वातावरण भक्तीमय बनले होते. घटस्थापने नंतर देवीची आरती करण्यात आली.


या सोहळ्याला ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, सचिव दत्तात्रय विटेकर, खजिनदार एकनाथ वाघ, विश्‍वस्त राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, गणेश कातोरे, महेश सप्रे, सचिन कोतकर आदींसह मनपाचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे, गंगाधर वाकळे, लक्ष्मण गव्हाणे, आकाश कातोरे, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेश कातोरे, हनुमंत कातोरे, साहेबराव सप्रे, ज्ञानदेव सप्रे, पंकज वाकळे, महेश कांडेकर, किशोर भोर, अशोक बडे, विशाल गोरख कातोरे, सिताराम भोर आदी मान्यवर व भाविक उपस्थित होते.


संबळ-डफच्या निनादात रेणुका मातेच्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून निघाला. मुंजोबा युवक मंडळाच्या तरुणांनी राशीन येथील देवीच्या मंदिरातून आणलेली पवित्र ज्योतचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या ज्योतद्वारे आमदार जगताप यांच्या हस्ते मालदीप ज्योत प्रज्वलीत करण्यात आली.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, नवरात्र उत्सवात नारी शक्ती असलेल्या देवीचे विविध रूप पूजले जातात. नारी शक्ती मोठी शक्ती असून, नारी ही समाजाची उध्दारकर्ती आहे. हिंदू धर्मात देवींना मोठे स्थान असून, ते शक्तीचे रूपे असल्याचे त्यांनी सांगितले.


नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी मंदिर परिसरात भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली. आरती, देवीच्या जयघोषांनी वातावरण अधिक मंगलमय झाले होते. यावेळी देवस्थानात आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने सौंदर्य खुलून दिसत आहे.


देवस्थानचे विश्‍वस्त गोरख कातोरे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले असल्याने यावर्षी सामाजिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांना फाटा देण्यात आला आहे. मंदिरात केवळ धार्मिक विधी, पूजा-अर्चा व घटस्थापना सोहळेच पार पडणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर यांनी दिली.


नवरात्रोत्सवाच्या काळात दररोज होणाऱ्या आरत्या, धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *