विजयी संघांची अंतिम सामन्यात धडक
फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शनिवारी (दि.20 सप्टेंबर) उपांत्य व उपांत्यपूर्व फुटबॉल सामन्यांचा थरार रंगला होता. 12 वर्ष वयोगटातील (मुले) उपांत्य सामन्यात आठरे पाटील, प्रवरा पब्लिक स्कूल आणि 17 वर्षा खालील मुलींमध्ये प्रवरा पब्लिक स्कूल व श्री साई इंग्लिश मीडियम स्कूलने विजय मिळवून अंतिम फेरी गाठली आहे. 14 वर्ष वयोगटात (मुले) विजयी झालेल्या प्रवरा पब्लिक स्कूलने उपांत्य फेरीत धडक मारली.
सकाळच्या सत्रात 12 वर्ष वयोगटात (मुले) उपांत्य फेरीचे सामने झाले. यामध्ये ऑक्झिलियम कॉन्व्हेंट विरुध्द आठरे पाटील यांच्यात झालेल्या सामन्यात ससे वेदांत याने 30 व्या मिनीटाला गोल करुन आठरे पाटील संघाला 0-1 गोलने विजय मिळवून दिला.
प्रवरा पब्लिक स्कूल विरुध्द आर्मी स्कूल मध्ये झालेल्या सामन्यात प्रवरा पब्लिक स्कूलच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन 0-2 गोलने विजय मिळवला. यामध्ये कुंदन बहिराम याने तिसऱ्या मिनीटाला व युवराज आहेर याने 26 व्या मिनीटाला प्रत्येकी 1 गोल केला.
दुपारच्या सत्रात 17 वर्षा खालील मुलींचे उपांत्य फेरीचे सामने पार पडले. प्रवरा पब्लिक स्कूल विरुध्द आठरे पाटील यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात प्रवरा पब्लिक स्कूलने 1-0 गोलने आठरे पाटील स्कूलचा पराभव केला. या सामन्यात दुसऱ्या मिनीटाला 1 गोल करुन चंचल गावीत विजयाची शिल्पकार ठरली.
श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल विरुध्द पोदार स्कूल मध्ये झालेल्या सामन्यात श्री साई संघाने 2-0 गोलने दणदणीत विजय मिळवला. यामध्ये स्वामिनी जाधव 7 व्या मिनीटाला व ह्रद्या तडके हिने 19 व्या मिनीटाला प्रत्येकी 1 गोल केले.
14 वर्ष वयोगटात (मुले) उपांत्यपूर्व फेरीचा सामना प्रवरा पब्लिक स्कूल विरुध्द आठरे पाटील स्कूल संघात रंगला होता. यामध्ये प्रवरा पब्लिक स्कूलने 3 गोल करुन 3-0 गोलने एकहाती विजय मिळवला. यामध्ये प्रवरा पब्लिक स्कूल कडून मोहित चौधरी याने 11 व 43 व्या मिनीटाला असे 2 गोल केले. तर जतीन गायकवाड याने 28 व्या मिनीटाला 1 गोल केला.
फुटबॉलच्या अंतिम सामन्याची लढत
12 वर्ष वयोगटात (मुले) आठरे पाटील विरुध्द प्रवरा पब्लिक स्कूल,
17 वर्षा खालील मुलींमध्ये प्रवरा पब्लिक स्कूल विरुध्द श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल