फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी (दि.12 सप्टेंबर) झालेल्या सामन्यात मुलांच्या 12 वर्ष वयोगटात आर्मी पब्लिक स्कूल व तक्षिला स्कूल, 14 वर्ष वयोगटात अशोकभाऊ फिरोदिया व 16 वर्ष वयोगटात आर्मी पब्लिक स्कूलने विजय मिळवला.
सकाळच्या सत्रात 14 वर्ष वयोगटात (मुले) कर्नल परब स्कूल विरुध्द अशोकभाऊ फिरोदिया स्कूलमध्ये अटीतटीचा सामना रंगला होता. कर्नल परब स्कूल कडून अथर्व तोडमल याने 1, तर अशोकभाऊ फिरोदिया कडून उमेर शेख याने 2 गोल करुन 1-2 ने अशोकभाऊ फिरोदिया संघाला विजय मिळवून दिला.
12 वर्ष वयोगटात (मुले) आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द ज्ञानसंपदा स्कूलमध्ये झालेल्या सामन्यात 2-0 गोलने आर्मी पब्लिक स्कूलने विजय मिळवला. यामध्ये हर्ष नेहारकर व संकल्प जाधव यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
16 वर्ष वयोगटात (मुले) आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द ज्ञानसंपदा स्कूलमध्ये झालेल्या सामन्यात लागोपाठ 4 गोल करुन आर्मी पब्लिक स्कूलने 4-0 ने एकहाती विजय मिळवला. यामध्ये आर्मी पब्लिक स्कूलचे खेळाडू प्रज्वल, वेदांत म्हस्के, वीरेंद्र वीर व अभिनव जी. यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
दुपारच्या सत्रात 17 वर्षा आतील मुलींमध्ये आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द कर्नल परब स्कूलमध्ये रंगतदार सामना झाला. यामध्ये दोन्ही संघांनी शेवट पर्यंत गोल करण्यासाठी आक्रमक खेळी केली होती. मात्र दोन्ही संघाना एकही गोल करता आला नाही. 0-0 गोलने हा सामना अनिर्णित राहिला.
12 वर्ष वयोगटात (मुले) तक्षिला स्कूल विरुध्द कर्नल परब स्कूल यांच्यात अटीतटीचा झाला. तक्षिलाचा खेळाडू अभिनव मोरे याने 2 गोल करुन संघाचा विजय निश्चित केला. तर कर्नल परब कडून प्रद्युम्न शेळके याने 1 गोल करुन संघाने आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तक्षिला स्कूलने बचावात्मक खेळ करुन प्रतिस्पर्धी संघाला 1 गोलवर शेवट पर्यंत रोखून धरले. यामध्ये 2-1 ने तक्षिला स्कूलचा संघ विजयी झाला.
