फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा
वेदिका ससे हिची 7 गोलची उत्कृष्ट खेळी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत बुधवारी (दि.10 सप्टेंबर) 17 वर्षा आतील मुलींमध्ये आठरे पाटील स्कूलने तब्बल 15 गोल व 12 वर्ष वयोगटात (मुले) द आयकॉन स्कूलने 10 गोल करुन प्रतिस्पर्धी संघाचा धुव्वा उडवीत विजय संपादन केले. तर 12 वर्ष वयोगटात (मुले) आर्मी पब्लिक स्कूल, आठरे पाटील स्कूल, ऑक्झिलियम कॉन्व्हेंट, 17 वर्षा आतील मुलींमध्ये श्री साई आणि16 वर्ष वयोगटात (मुले) सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट संघाने विजय संपादन केले. आठरे पाटील स्कूलची खेळाडू वेदिका ससे हिने 7 गोल करुन आपल्या उत्कृष्ट खेळाची छाप पाडली.
सकाळच्या सत्रात 12 वर्ष वयोगटात (मुले) आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द तक्षिला स्कूलमध्ये झालेल्या सामन्यात आर्मी पब्लिक स्कूलने 3-0 गोलने विजय मिळवला. यामध्ये हर्ष नेहारकर याने 2 व राज राऊत याने 1 गोल केला.
आठरे पाटील स्कूल विरुध्द ज्ञानसंपदा यांच्यात सामना रंगला होता. आठरे पाटीलकडून वेदांत ससे याने गोलची डबल हॅट्रीक केली. तर भावेश नेरे याने 1 गोल केला. ज्ञानसंपदा कडून सत्या चौधरी याने 1 गोल करुन खाते उघडले होते. मात्र त्यापुढे संघाला गोल करता आला नाही. 7-1 गोलने आठरे पाटील स्कूलचा संघ विजयी ठरला.
17 वर्षा आतील मुलींमध्ये आठरे पाटील स्कूल विरुध्द डॉन बॉस्को यांच्यात झालेल्या सामन्यात आठरे पाटील स्कूलच्या मुलींनी आक्रमक खेळी करुन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. चक्क एकामागोमाग तब्बल 15 गोल करुन प्रतिस्पर्धी संघाचा धुव्वा उडवला. या सामन्यात डॉन बॉस्कोला एकही गोल करता आला नाही. 15-0 गोलने आठरे पाटील स्कूलचा संघ विजयी ठरला. यामध्ये वेदिका ससे हिने 7 गोल केले. इरम कुद्दुस, स्वरांजली शेळके, निलम पवार यांनी प्रत्येकी 2 गोल केले. अफिया सय्यद व अक्षरा कराळे यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
दुपारच्या सत्रात 16 वर्ष वयोगटात (मुले) सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट विरुध्द डॉन बॉस्को यांच्यात झालेल्या सामन्यात सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंटच्या संघाने 5-0 गोलने विजय मिळवला. या सामन्यात आक्रमक खेळी करुन जोएल साठे याने 2 व आर्यन आठवल, आयुष धापटकर व माहीर गुंदेचा याने उत्कृष्ट खेळ करुन प्रत्येकी 1 गोल केला.
12 वर्ष वयोगटात (मुले) ऑक्झिलियम कॉन्व्हेंट विरुध्द ऊर्जा गुरुकुल यांच्यात झालेल्या सामन्यात ऑक्झिलियम कॉन्व्हेंटकडून वेदांत बांगर व आशिष आढाव यांनी प्रत्येकी 1 गोल करुन संघाला 2-0 ने विजय मिळवून दिला.
द आयकॉन स्कूल विरुध्द श्री साई संघात झालेल्या सामन्यात द आयकॉन स्कूलने 10 गोल करुन एकहाती विजय संपादन केले. द आयकॉनच्या उत्कृष्ट खेळापुढे श्री साईला एकही गोल करता आला नाही. 10-0 गोलने द आयकॉन स्कूलचा संघ विजयी झाला. यामध्ये आयकॉनकडून पर्व लोढा याने 4 गोल केले. देवर्श पत्की याने 2 व युग कांकरिया, विहान कासकर, अरहान सय्यद लोकेश मुनोत यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
17 वर्षा आतील मुलींमध्ये द आयकॉन विरुध्द श्री साई यांच्यात झालेल्या सामन्यात 0-2 गोलने श्री साई संघाने विजय मिळवला. यामध्ये ह्रद्या तडके व स्वामिनी जाधव यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
