पितृछत्र हरपलेल्या गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात
शिक्षणाची ताकद ही पिढ्यांचे भविष्य बदलण्याची क्षमता ठेवते -सुनिल सकट
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक साक्षरता दिनानिमित्त नालेगाव येथे सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र शासनाचा समाजभूषण पुरस्कार प्राप्त व भाजपाचे माजी चिटणीस सुनिल सकट यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
या प्रसंगी कु. आरती सुनिल सकट व नंदाताई दातरंगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.नुकतेच पितृछत्र हरपलेल्या कु. सोनाक्षी नांगरे व कु. देवेश नांगरे या दोन्ही विद्यार्थ्यांना शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देण्यात आले.
सुनिल सकट म्हणाले की, शिक्षण हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे. साक्षर समाज म्हणजे सशक्त समाज. शिक्षणाची ताकद ही पिढ्यांचे भविष्य बदलण्याची क्षमता ठेवते. समाजातील प्रत्येक मुलाला शिक्षणाची संधी मिळावी, हीच खरी साक्षरता दिन साजरा करण्याची योग्य पद्धत आहे. शिक्षणाशिवाय समाजाचा विकास शक्य नाही. समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची उभारी देणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. तर मागील 20 वर्षांपासून समाजातील गरजू, वंचित घटकांसाठी शैक्षणिक मदतीचे कार्य सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.