सुमय्या शेख हिची महाराष्ट्राच्या संघात निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- हिरो ज्युनिअर राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेत नगरच्या पल्लवी रुपेश सैंदाणे यांची संघ व्यवस्थापक तर सुमय्या शेख हिची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.
सतरा वर्षाखालील महिलांची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आसाम राज्यातील गुवाहाटी येथे 18 जून ते 4 जुलै दरम्यान होत आहे. नुकतेच महाराष्ट्राचा महिलांचा फुटबॉल संघाची घोषणा करण्यात आली आहे. पुणे येथील वैष्णवी सोनवणे महाराष्ट्र संघाचे कर्णधार म्हणून नेतृत्व करणार आहे. संघासाठी प्रमुख प्रशिक्षक म्हणून सचिन नरसप्पा, सहाय्यक प्रशिक्षक अशिश कटारा, फिजिओथेरपिस्ट स्मृती पवार यांची नियुक्ती झाली आहे. महिलांच्या फुटबॉल संघाला वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे सचिव साऊटर वॉझ यांनी शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू, संघ व्यवस्थापक व प्रशिक्षकांचे अहमदनगर डिस्ट्रीक्ट फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, फिरोदिया शिवाजीयन्सचे अध्यक्ष तथा फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, सचिव गॉडविन डिक यांनी अभिनंदन केले.