लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेतील पालकांचा संतप्त सूर!
पालकांची आपत्कालीन बैठक; संस्थेच्या कार्यकारिणीला निवेदनद्वारे आंदोलनाचा इशारा
नगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विभागाचे कार्यरत मुख्याध्यापक शिवाजी लंके यांची अचानक बदली करण्यात आल्याने शाळेतील पालक वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. संस्थेच्या या निर्णयाविरोधात पालकांनी एकत्र येऊन आपत्कालीन बैठक घेऊन लंके सरांची बदली तात्काळ रद्द करण्याची मागणी केली.
लंके हे गेल्या अनेक वर्षांपासून या शाळेत कार्यरत असून त्यांच्या दूरदृष्टी, काटेकोर प्रशासनशैली, विद्यार्थ्यांप्रती कळकळ, व परिणामकारक नेतृत्वामुळे शाळेने शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात भरीव यश संपादन केले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी राबवलेले उपक्रम, मार्गदर्शन आणि कौशल्यवर्धनाच्या योजना यामुळे पालकवर्ग व ग्रामस्थांमध्ये त्यांच्याविषयी मोठा विश्वास निर्माण झाला आहे. लंके सरांचं या शाळेत असणं म्हणजे आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी संरक्षण आहे. त्यांच्या जाण्याने शाळेचा पाया कमकुवत होईल अशा भावना पालकांनी व्यक्त केल्या आहेत.
या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये पालक प्रतिनिधींनी आपल्या भावना मांडत, संस्थेच्या कार्यकारिणीला दिलेल्या निवेदनात, लंके यांच्या बदलीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असून, ही बदली मागे घेण्यात यावी, अन्यथा आंदोलनात्मक पावले उचलावी लागतील, अशा इशारा देण्यात आला आहे. तर पालकांनी संघटित पद्धतीने मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
गुणवंत शिक्षकांवर अन्याय झाला, तर शिक्षण संस्थेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. संस्थेच्या निर्णयप्रक्रियेत पालकांची भावना महत्त्वाची आहे. माजी विद्यार्थ्यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून लंके सरांच्या बदलीविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली असून, या विषयाने आता व्यापक स्वरूप धारण केले असून, बदली रद्द होत नाही तो पर्यंत हे वाद अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहे.