देशाच्या सैनिकांची सेवा ही ईश्वर सेवा -ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर
नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील खंडाळा येथील उमेश चंद्रभान लोटके भारतीय सैन्या मधून (बॉम्बे इंजिनिअर ग्रुप खडकी 106 रेजिमेंट) सेवानिवृत्त झाले आहे. त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त अरणगाव ते खंडाळा त्यांची मिरवणूक काढण्यात आली. तर ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमेश यांनी भारतीय सैन्यात 17 वर्षे देश सेवा केली. देशातील लेह, लदाख, पालमपूर, पंजाब, जयपुर, जोधपुर, पुणे येथे सेवा बजावून ते नुकतेच निवृत्त झाले आहेत. ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त गौरवपूर्ण सन्मान करण्यात आला. उद्योजक राहुल चंद्रभान लोटके, खंडाळा, खडकी, वाळकी, अरणगाव, बाबर्डी, नगरशहर सर्व सरपंच, ग्रामस्थांच्या वतीने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर म्हणाले की, देशाचे सैनिक करत असलेली देश सेवा ही ईश्वर सेवा आहे. उमेश लोटके यांनी आहोरात्र हीच ईश्वर सेवा केली. त्यांनी सीमेवर राहून आपल्या आई, वडील, पत्नी, मुले यांची सेवा केली, एक शेतकरी गरीब कुटुंबातील पुत्र सीमेवर जाऊन आपल्या देशाचे रक्षण करतो, ही खूप मोठी गोष्ट आहे. आपल्या गरीबीवर मात करून 17 वर्ष सीमेवर काढली यांच्यावर संस्कार करणारे आई-वडील पुण्यवंत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे इंदुरीकर महाराज यांनी आई-वडिलांच्या प्रेरणा व संस्काराने माणूस मोठा होऊ शकतो. आजच्या काळातील आई-वडील मुलांना आपल्या हाताच्या फोड प्रमाणे जपतात. पण संस्कार देण्यामध्ये मागे पडत आहेत. कोट्यावधी रुपयांचे बंगले असणारे सुखी-समाधानी नाही. समाधानी रहायचं असेल तर देवा पेशा आपल्या आई-वडील ची सेवा करण्याचे त्यांनी आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर, आमदार काशिनाथ दाते सर, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, सागरभैय्या बेग, पारनेर तालुका अध्यक्ष राहुल पाटील, नगर तालुकाध्यक्ष दीपक कार्ले, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, सुखाशेठ पवार, योगेश ठुबे, शंकर मामा पवार, शिवा मोरे, गुलाब कार्ले, सरपंच, जि.प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, युवा नेते, आदी विविध क्षेत्रातील उद्योजक आणि व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.