संत पंढरीमध्ये भाविकांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा पार
संतांच्या जीवन कार्यातून जीवनाचा खरा अर्थ कळतो -बाळासाहेब देशमुख
नगर (प्रतिनिधी)- ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते त्र्यंबकराव उर्फ बाळासाहेब देशमुख लिखित संत आईसाहेब महाराज देशमुख व संत पळसेकर महाराज या धार्मिक चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन पिंपळगाव वाघा (ता. नगर) येथील संत पंढरी क्षेत्रात श्रद्धाभावाने संपन्न झाले. सिद्धेश्वर मंदिरात ह.भ.प. बारगळ महाराज यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या प्रसंगी विकासानंद महाराज मिसाळ, नाणेकर महाराज, राजेश्वरानंद कुर्हे महाराज, विठ्ठल पवार, कार्ले सर, मनोज कार्ले, मोहनराव मोरे, पै. नाना डोंगरे, देशमुख कुटुंबीय, लक्ष्मण वाघमारे, शिवाजी वाघमारे, राजेंद्र घोडके, मेजर दत्तात्रय कनेरकर, महादेव शिंदे, सलीमभाई आत्तार, बाळासाहेब वाघ, रासकर बंधू, विठ्ठल भोर, भैय्याजी आत्तार, कृष्णनाथ रासकर गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ह.भ.प. बारगळ महाराज म्हणाले की, संतांचे जीवन म्हणजे भक्ती, त्याग आणि समाजप्रबोधनाचा मार्ग आहे. बाळासाहेब देशमुख यांनी लिहिलेल्या या पुस्तकातून संत आईसाहेब व पळसेकर महाराजांच्या अध्यात्मिक कार्याचा प्रेरणादायी इतिहास उलगडला आहे. नव्या पिढीने या संतांचे कार्य व विचार जाणून घेणे आवश्यक आहे. संत परंपरेचा वारसा चालविणाऱ्या या विभूतींचे कार्य समाजापुढे पुस्तकाच्या रुपाने येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लेखक बाळासाहेब देशमुख यांनी संतांच्या जीवन कार्यातून जीवनाचा खरा अर्थ कळतो. त्यांचे विचार व कार्य समाजाला प्रेरणा देतात. त्यांचे विचार समाजाला दीपस्तंभाप्रमाणे असून, ते समाजापुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न पुस्तकाच्या रुपाने करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
श्रीगोंदा येथे झालेल्या ईपीएस 95 पेन्शनधारकांच्या मेळाव्यात राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांना या धार्मिक पुस्तकांची प्रत भेट देण्यात आली. यावेळी सौ. राऊत, सरिता नारखेडे, सुभाषराव पोखरकर, संपतराव समिंदर, आशाताई शिंदे, आप्पासाहेब वाळके, बापूसाहेब बहिरट, डॉ. गाडेकर, रावसाहेब मांडे, शिवाजी थोरात आदी उपस्थित होते.
श्रीक्षेत्र ओतूर येथे हरिभक्त परायण माऊली महाराज, ज्ञानेश्वर महाराज कदम, देहू संस्थान प्रमुख मोरे महाराज, निवृत्ती महाराज कापसे, महादेव गायधनी, सुरेश देरींगे यांच्यासह अनेक संतांना हे ग्रंथ भेट स्वरूपात प्रदान करण्यात आले. यापूर्वीही बाळासाहेब देशमुख यांची श्री क्षेत्र मांडवगण, सिद्धेश्वर दर्शन, आबा मास्टर, तसेच द माउंटन मॅन ही प्रेरणादायी पुस्तके प्रकाशित झाली आहे. संत आईसाहेब महाराज देशमुख या मूळच्या मांडवगण येथील होत्या. याच गावात त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी व गुरू पळसेकर महाराज यांनी नाशिक येथे माघ शू. द्वितीया सन 1660 मध्ये संजीवन समाधी घेतली आहे. हे पुस्तक लिहिण्यासाठी देशमुख यांना धाकटे माऊली ज्ञानेश्वर महाराज कदम यांचे मार्गदर्शन मिळाले.