शहरात खेळातून सलोख्याचा संदेश
के.जी. सरकारफ संघ विजेता; 32 संघांचा उत्स्फूर्त सहभाग
नगर (प्रतिनिधी)- सामाजिक सलोखा आणि युवकांमध्ये एकोप्याची भावना वृद्धिंगत होण्यासाठी सर्जेपुरा यंग पार्टीच्या वतीने आयोजित सर्वधर्मसमभाव चषक क्रिकेट स्पर्धेला शहराच्या विविध भागांतील संघांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्लास्टिक बॉलवर रात्रीच्या फ्लड लाईटमध्ये खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत के.जी. सरकार संघाने विजेतेपद पटकावले, तर स्टार .. संघ उपविजेता, आणि सर्जेपुरा ए संघ तृतीय क्रमांकावर राहिला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण सर्जेपुरा येथील रहेमत सुलतान सभागृहात पार पडले. या कार्यक्रमास यंग पार्टीचे अध्यक्ष दानिश शेख, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई) शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, उद्योजक विकी इंगळे, पै. यासर शेख, पै. अरबाज शेख, वसीम शेख, मुदस्सर शेख यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात दानिश शेख यांनी शहरातील युवकांना एकत्र आणून सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. खेळाच्या माध्यमातून सलोखा वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विक्की इंगळे म्हणाले की, राजकीय स्वार्थासाठी जातीयतेची बीजे पेरली जात आहेत. मात्र सर्जेपुरा यंग पार्टीने सर्वधर्मसमभाव जपणारी ही स्पर्धा आयोजित करून दिशादर्शक उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले.
सुशांत म्हस्के म्हणाले की, सर्व समाजातील युवकांनी एकत्र येवून स्वत:ची प्रश्न स्वत: सोडवली पाहिजे. युवक आर्थिक फायद्यासाठी राजकारण्यांच्या दावणीला बांधली जात असताना त्यांचा वापर जातीयवादासाठी केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आदिल शेख यांनी विजेत्या संघांना शुभेच्छा दिल्या.
32 संघांचा सहभाग लाभलेल्या या स्पर्धेमध्ये अंतिम तीन विजेत्या संघांना अनुक्रमे 8,000 रुपये (प्रथम), 5,000 रुपये (द्वितीय), व 3,000 रुपये (तृतीय) रोख बक्षिसे, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अबरार शेख यांनी तर संयोजनासाठी फारुख नालबंद, असिफ शेख, आदिल शेख, जावेद सय्यद, राजू शेख, मुबिन शेख, मतीन शेख, अखिल सय्यद, जफर शेख, अयान नालबंद, अरबाज खान, सलमान शेख, जैद शेख, शारुख शेख, मुद्दू शेख आदींनी परिश्रम घेतले.